<
जळगांव(प्रतिनीधी)- पुण्यातील कला महोत्सवात आज ” अमृता साहिर इमरोज ” आणि ” नली ” या नाट्य प्रयोगांनी रसिक भारावले. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स व नाटकघर पुणे आयोजित “परिवर्तन कला महोत्सवा”च्या दुसऱ्या दिवशी दिनांक ४जानेवारी शनिवार रोजी ज्योत्स्ना भोळे सभागृहात परीवर्तन निर्मित शंभू पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित “अमृता, साहिर, इमरोज” या दीर्घ नाट्याचा प्रयोग सादर झाला. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या साहित्य व जीवनाविषयी प्रसिद्ध कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या मधील प्रेमाविषयी तसेच प्रसिद्ध चित्रकार इमरोज यांच्या व अमृता प्रीतम यांच्यातील नातेसंबंधांवर अतिशय तरल पद्धतीने दीर्घ नाट्य परिवर्तनाच्या कलावंतांनी सादर केले. अमृता प्रीतम या नावाविषयी, त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीविषयी भारतीय जनमानसाला नेहमीच कुतूहल आणि जिज्ञासा राहिली आहे. शंभू पाटील यांच्या अभिनयातून साहिर, इमरोज आणि वाचक प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देऊन गेला. अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत हर्षदा कोल्हटकर यांनी त्यांच्या साहित्यिक कारकिर्दी बरोबरच वैयक्तिक जीवनातील प्रेम, सामाजिक जाणिवा अतिशय प्रभावीपणे अभिनयातून सादर केल्या. प्रत्यक्ष अमृता प्रेक्षकांसमोर उभी राहीली, तिच्या आयुष्यात डोकावताना प्रेक्षक हसले, अंतर्मुख झाले, हळहळलेही.या प्रयोगानंतर श्रीकांत देशमुख लिखित शंभू पाटील यांनी नाट्यरुपांतर केलेल्या व योगेश पाटील दिग्दर्शित “नली” हे एकल नाट्य सादर झाले. यात प्रमुख भूमिका हर्षल पाटील यांची होती. ग्रामीण भागातील शिक्षण सामाजिक परिस्थिती तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांना स्पर्श करीत एकाच व्यक्तीने अनेक भूमिका कसदार पद्धतीने सादर केल्या. या दोन्ही नाट्यप्रयोगाना पुणेकर रसिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेते नंदू माधव व ज्येष्ठ दिग्दर्शक आणि नाटकघर प्रमुख अतुल पेठे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भूमिका मांडली. आणि यातून एक वेगळ्या प्रकारचा खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रायोगिक स्तरावर काम करणाऱ्या परिवर्तन सारख्या महत्त्वाच्या संस्थेचा तीन दिवसांचा कला महोत्सव हा पुण्यात आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. या दोन्ही नाट्यप्रयोगांचं सादरीकरण हे अतिशय सफाईदारपणे, उत्तम पद्धतीने झाल. पार्श्वसंगीत, प्रकाश योजना उत्तम पद्धतीने परिवर्तनाच्या कलावंतांनी केली. यात राहूल निंबाळकर, मंगेश कुलकर्णी, योगेश पाटील मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर, सोनाली पाटील, विजय जैन आदींनी प्रयोगासाठी मेहनत घेतली. चित्रकार शुभा गोखले, सदानंद जोशी, ओंकार गोवर्धन आदी अनेक मान्यवरांनी प्रयोगांचे कौतुक केले. संबंध सभागृह हाऊसफुल झाल्याने प्रेक्षक खाली बसून आस्वाद घेत होते. पुण्यात देखील प्रयोग हाऊसफुल होणं हे जळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. उद्या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दिनांक ५जानेवारी रविवारी बहिणाबाई चौधरींच्या गाण्यांचा व कवितांचा सांगीतिक कार्यक्रम “अरे संसार संसार” हा सादर होणार आहे . वेळ सायंकाळी सात वाजता. ज्योत्स्ना भोळे सभागृह हिराबाग येथे होणार आहे. तरी पुणेकर रसिकांनी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बहिणाबाईंची कविता व खानदेशी संस्कृती नाशिक सौंदर्य अनुभवण्यासाठी यावे असे आवाहन आर सी बाफना ज्वेलर्स व नाटक घर या या संस्थांच्या वतीने करण्यात आलेल आहे.