<
जळगांव(प्रतिनीधी)- रतनलाल सी बाफना ज्वेलर्स व नाटक घर पुणे आयोजित “परिवर्तन कला महोत्सवा”चा समारोप ज्योत्स्ना भोळे सभागृहात करण्यात आला. या प्रसंगी परिवर्तन निर्मित ‘अरे संसार संसार’ हा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा आणि गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. दि. ३, ४ आणि ५ जानेवारी असे तीन दिवस जळगावच्या कलावंतांनी पुण्यात परिवर्तन कला महोत्सवात सादरीकरण केले. शेवटच्या दिवशी बहिणाबाईच्या कविता आणि गाणी अतिशय उत्कट पद्धतीने सादर करण्यात आल्या. संकल्पना विजय जैन यांची होती. याप्रसंगी ज्येष्ठ गायिका सुदिप्ता सरकार, मंजुषा भिडे, श्रद्धा कुलकर्णी पुराणिक, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये यांनी आपल्या स्वरातून बहिणाबाईंच्या शब्दांना रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. याप्रसंगी प्रतिक्षा जंगम यांनी खानदेशी परंपरेतील लोकसाहित्यातील भालचंद्र नेमाडे लिखित ‘मुंजा’ ही वही सादर केली. रंगमंचावर हर्षल पाटील व सोनाली पाटील यांनी बहिणाबाईच्या कविता सादर केल्या. तबल्यावर साथ-संगत भूषण गुरव यांची तर मनीष गुरव व प्रितेश बाविस्कर यांनी ढोलकी व बासरीवर साथ-संगत दिली. कार्यक्रमाचे निवेदन शंभू पाटील यांनी करताना बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचे महत्व सांगत, खानदेशी लोकसंस्कृती व लोकपरंपरा यांच्याशी तिचं नातं किती अनोख आहे हे मांडलं. या कार्यक्रमातून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील खान्देश, जळगाव, असोदा व खान्देशी लोकपरंपरा यांचं अनोखं दर्शन परिवर्तनाच्या कलावंतांनी सादर केले. पुणेकर रसिकांना ही बहिणाबाई वेगळी वाटली म्हणून खूपच भावली. भारावलेल्या सभागृहाने उत्कट प्रतिसाद देत बहिणाबाईला मानवंदना दिली. याप्रसंगी रंगमंचावर नेपथ्य विजय जैन व मंगेश कुलकर्णी यांचं होतं तर प्रकाशयोजना राहुल निंबाळकर यांची होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कलावंत, पत्रकार विजय बाविस्कर, नंदू माधव व माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ चित्रकार शुभा गोखले, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, भातृ मंडळाचे प्रमुख रवींद्र चौधरी यांच्यासह साहित्य, नाट्य, संगीत, चित्रकला या क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते. शेवटच्या दिवशी पुणेकर रसिकांनी उदंड असा प्रतिसाद देत संपूर्ण महोत्सव यशस्वी केला. महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांचेही मोलाचे सहकार्य या महोत्सवाला लाभलं. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स व नाटक घर पुणे यांनी आयोजित केलेला परिवर्तन कला महोत्सव हा अविस्मरणीय असा संपन्न झाला.