<
एरंडोल(प्रतिनिधी)- जीवन जगत असताना जीवनात सामाजिक व नैतिक मूल्य जोपासण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असून सर्वांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. तसेच जीवनात सर्वच महापुरुषांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे उपयुक्त असून माँ साहेब राजमाता जिजाऊ या आदर्श संस्कार पीठ आणि मातृशक्तीचा सर्वोच्च मानबिंदू आहेत, त्यांचे विचार सर्वांसाठी व व समाज सुधारणांच्या जडणघडणीसाठी महत्वपूर्ण आहेत. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक मराठा सेवा संघाचे एरंडोल तालुका अध्यक्ष राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी किशोर पाटील कुंझरकर यांनी दिनांक १२ रोजी एरंडोल येथील शिक्षण विभागाच्या वतीने गटसाधन केंद्रात आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख नारायण बोरसे, ग स सोसायटी संचालक भाईदास पाटील, सपकाळे सर, मंदार वडगावकर व शिक्षक वृंद आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी व सर्वांनी अभिवादन केले. पुढे बोलताना कुंझरकर म्हणाले की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज ४२२ वी जयंती आहे आजही त्यांचे विचार जीवन कार्य राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांना आवश्यक व उपयुक्त आहे म्हणून सर्वच शासन त्यांच्या विचारांचा आधार घेतात. तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय म्हणून माँ साहेबांना अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानावरून बोलताना गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक शिक्षक व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.