<
रस्ता सुरक्षेचा दृष्टीने विविध विषयांवर केले मार्गदर्शन
जळगांव(प्रतिनीधी)- रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. असच महामार्ग पोलीस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. राज्यात दरवर्षी सरासरी हजारो लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. तसेच या अपघातामधे मृत्युमुखी पडणाऱ्या ८० टक्के लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३० वयोगटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळ जर एवढ्या मोठया प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर ती राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याने महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने हा सप्ताह शहरातील ट्रांसपोर्ट नगर एम आय डि सी येथे राबविण्यात आला. यावेळी येथील वाहन चालकांना मार्गदर्शनपर वाहतुक नियमांचे पत्रके वाटून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करतांना महामार्ग पोलिस पाळधी चे स.पो.नि. सुनील मेढे मार्गदर्शन करतांना म्हणाले, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही वाहतुक नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नंतर याप्रसंगी उपस्थित मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले की, आपल्या अधिकार व हक्कांबाबत नागरिक जागृत असतात. ते असायलाही हवे. मात्र कर्तव्यांबाबत आपण फारसे गंभीर दिसत नाही. कायद्याचे पालन करणे हे सुद्धा आपले मुलभूत कर्तव्यच आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी स.फौ.ममराज जाधव,डॉ. शरीफ बागवान,गुलाब मनोरे, पो.हे.काँ. प्रदिप रणित, पंकज बडगुजर, पो.ना.पवन देशमुख, नितीन सपकाळे, समीर तडवी, अफजल तडवी, दिपक पाटील,हेमंत महाडिक, आदी पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.