जळगाव(प्रतिनिधि)- येथील प्रगती विद्यामंदिरात साबण निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण व्हावा व एक नविन भावी वैज्ञानिक घडावा या दृष्टिकोनातून शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी साबण बनविणे कार्यशाळेचे आयोजन व नियोजन केले होते. यात विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेऊन त्यांचे गट पाडण्यात आले होते. तसेच प्रत्येक गटाला साबण बनविण्यासाठी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्याची जबाबदारी देण्यात आली होती. यात साहित्य म्हणून खोबरेल तेल, मीठ, सुवासिक द्रव्य, सोडिअम हायड्रॉक्साइड, काचकांडी, चंचुपात्र, तीवई, लोखंडी जाळी, बर्नर, पाणी, साचा यांचा वापर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना आपण घरी वापरत असलेला साबण प्रयोगशाळेतही बनवु शकतो याचे कुतूहल, जिज्ञासा व एक प्रकारचे नवलच वाटत होते. प्रयोगशाळेत साबण बनविण्याची कृति शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत सांगून एक एक कृति स्पष्ट करून साबण निर्मिती केली. साबण निर्मिती बघुन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.या उपकर्माचे सर्व पालकांनी तसेच संस्थेचे चेअरमेन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी कौतुक केले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याद्यापिका शोभा फेगडे शिक्षक रमेश ससाने,पंकज नन्नवरे प्रयोगशाळा सहाय्यक विजय चव्हाण व शिक्षकेतर कर्मचारी किशोर तिवारी आदी उपस्थित होते.