खेळाडूवृत्ती जोपासून स्पर्धेत यश मिळवा;पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
जळगाव-(जिमाका) – स्पर्धा म्हटली यश, अपयश हे येणारच. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे खेळाडूंनी अपयशाने नाराज न होता खेळाडूवृत्ती जोपासून स्पर्धेत यश मिळवावे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शासनाच्या जलसंपदा विभागाच्या तीन दिवसीय राज्य क्रीडा, कला, सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन येथील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज परिसर येथे पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रंजना पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता आनंदा मोरे, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता व प्रशासन सु, ज. वंजारी, अधिक्षक अभियंता श्री. गायकवाड, व्ही. डी. पाटील, व्ही. एम. कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, तुषार चिनावलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, नोकरीत ताणतणाव असतात. परंतु क्रीडा स्पर्धामुळे तणावविरहीत जीवन जगण्यास मदत होते. त्याचबरोबर अधिकारी, कर्मंचारी यांना आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळते. कुठलीही स्पर्धा ही जिंकण्यासाठीच खेळायची असली तरी स्पर्धेमध्ये एक जण जिंकतो तर दुसरा हारत असतो. त्यामुळे हारणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुन्हा यश मिळविण्यासाठी खेळाडूवृत्ती जोपासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी यांनी या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगितला. या स्पर्धामध्ये कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, नाटक, एकांकिका, नृत्य यासह विविध 14 प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा होणार असून यामध्ये जलसंपदा विभागाचे विदर्भ पाटबंधारे, कोकण पाटबंधारे, मराठवाडा गोदावरी पाटबंधारे, महाराष्ट्र कृष्णा खोरे, तापी पाटबंधारे, मंत्रालय, मुंबई जलसंपदा विभाग, महासंचालक, मेरी, नाशिक, जलसंपदा यांत्रिकी विभाग या 8 संघाचे एकूण 1600 खेळाडू सहभागी झाले आहे. जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा मान जळगाव ला मिळाल्याबद्दल त्यांनी विभागाचे आभार मानले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सर विश्वेश्वरय्या आणि सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले. यावेळी सर्व संघाचे संचलन पार पडले. सर्व संघाच्या खेळाडूनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. संचलनाचे नेतृत्व जळगाव पोलीस दलाच्या बॅन्ड पथकाने केले. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ढोल पथकाने विविध प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितीतांची मने जिंकली. या पथकात सात वर्षाच्या लिखित रोझोरकर या चिमुकल्यापासून ते 58 वर्षापर्यंतच्या एकूण 45 जणांच्या चमुचा समावेश होता. उपस्थित सर्व खेळाडूंना मेरी संघाचे संतोष भोसले यांनी शपथ दिली. तर तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे खेळाडू सचिन पाटील, ममता सपकाळे, अनुज ठाकूर यांनी क्रीडाज्योत आणली.
कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती अपूर्वा वाणी यांनी केले तर उपस्थितांचे आभार आनंद मोरे यांनी मानले.