<
जळगाव- (जिमाका)- देशाला महासत्ता बनविण्यासाठी युवा सदृढ असणे आवश्यक आहे. देशातील युवावर्ग सदृढ असेल तर नवीन विचारांना चालना मिळते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदृढ भारत निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडादिनी फिट इंडिया मोहिम सुरू केली.
या मोहिमेतंर्गत भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जळगाव तर्फे फिट इंडिया सायक्लोथॉनचे आज शहरात आयोजन करण्यात आले होते. शिवतीर्थ मैदानापासून सुरू झालेल्या या सायकल रॅलीचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. मिलींद दिक्षीत, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार भोळे म्हणाले की, केंद्र शासनाने अनेक योजना, उपक्रम हाती घेतले. स्वच्छ भारत, खेलो इंडिया, फिट इंडिया सारख्या उपक्रमातून त्यांनी उपक्रमाचा एक नवीन पायंडा घालून दिला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांनीही मनोगत व्यक्त केले.
रॅलीत मान्यवरांचा सहभाग
सकाळी 8 वाजता शिवतीर्थ मैदानावर आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रॅलीत आमदार भोळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्यासह अनुभूती स्कूलचे शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, विद्यार्थी, रनर्स ग्रुप, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे सहकारी देखील सहभागी झाले होते. शिवतीर्थ मैदानापासून रॅलीला सुरूवात झाल्यानंतर चित्रा चौक, जुने बसस्थानक, टॉवर चौक, नेहरू चौक, खान्देश सेंट्रल, गोविंदा रिक्षा स्टॉप मार्गे पुन्हा शिवतीर्थ मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आकाश धनगर यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी केले. आभार चेतन वाणी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देविका सपकाळे, शिवदास कोचुरे, मेघा शिरसाठ, निलेश पाटील, प्राजक्ता भांडरकर, संजय बाविस्कर, ज्योती बाविस्कर आदींसह नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. रॅलीच्या समारोपानंतर सहभागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच फिट इंडिया उपक्रमाच्या संकेतस्थळावरून ई प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.