<
जळगाव-(जिमाका) :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन लसीकरण मोहिमेस प्रारंभ केला. यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकास पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्तेही बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे आदींसह जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.