<
जळगाव : येथील युवा सेना जळगाव जिल्हातर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी १९ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरशालेय जिल्हा बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अखेर चाळीसगावच्या राष्ट्रीय विद्यालयाने एरंडोलच्या जिजामाता विद्यालयावर एका पौइंटने विजय मिळवीत बाळासाहेब चषकावर नाव कोरले. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन युवा सेना राज्य विस्तारक तथा माजी नगरसेवक किशोर भोसले आणि शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर बास्केटबॉल संघांचे सामने सुरु झाले. स्पर्धेत दिवसभरात ३५ सामने खेळविण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे १५ पेक्षा विविध विद्यालयांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी युवा सेना जिल्हा अधिकारी शिवराज पाटील, युवसेनेचे महानगर अधिकारी विशाल वाणी, स्पर्धा समन्वयक जिल्हा उप अधिकारी पियुष गांधी, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव जितेंद्र शिंदे उपस्थित होते. यावेळी विजेता संघ म्हणून चाळीसगावचा राष्ट्रीय विद्यालयाचा संघ, उपविजेता एरंडोलचा जिजामाता विद्यालय व तृतीय विजेता संघ सेंट टेरेसा विद्यालय, जळगाव यांना गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सोमवारी २० जानेवारी रोजी सुभाष चौकातील बोहरा गल्लीत कामगारांना रुमाल वाटप करण्यात येणार आहेत.