<
जळगाव : शहरातील महत्वाचा ग्रामीण भाग असलेला मेहरूण येथे वॉर्ड क्र. १५ मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणा अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले आहे.
मेहरूण भागात प्रसिद्ध पंचमुखी महादेव मंदिराजवळ मोठ्या गटारी व नाले उघडे पडले होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. तसेच शालेय मुले व वाहनधारकांची ये-जा देखील धोकादायक झाली होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणाअंतर्गत महादेव मंदिराजवळील नाल्यावर पुल बांधणे व गाव बुरुज या ठिकाणी नाल्यावर पुल बांधणे या दोघी कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले होते. प्रभागातील नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन, शबानाबी खाटीक यांच्यासह भागातील नागरिकांनी विकासकामांचे भूमिपूजन केले. भूमीपूजनानंतर लगेचच विकासकामास सुरुवात झाली आहे. यावेळी महानगरपालिकेचे शाखा अभियंता विजय मराठे व नगररचना विभागातील इंजिनियर आर. टी. पाटील उपस्थित होते.
विकासकामाला सुमारे दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरीकांना गैरसोय होईल, पूल बांधल्यावर आरोग्याची समस्या सुटणार आहे. गटारी व नाले बंदिस्तदेखील होतील. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवकांनी केले आहे.