<
प्रेमाला अदृश्य सीमा असतात. हट्टाला नाही. प्रेम द्यायला शिकवते तर हट्ट घ्यायला. प्रेम डोळे उघडते तर हट्टाने ते मिटतात. प्रेम माणसांना जोडते तर हट्ट ते तोडण्याचे काम करते. प्रेमात आपुलकी आणि आनंद आहे तर हट्टात अहंकार आणि असूया.
साधारणपणे लोकं गल्लत करतात हट्ट आणि प्रेम या दोन परस्पर विरोधी भावना मध्ये. माणसाचं मन हे एक समुद्रासारखं आहे. ज्या वेळी ह्या भावनांची मोठी लाट येते, ते जोरजोरात उसळू लागतं, नाहीतर एकतर शांत होतं. आपल्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा परिस्थिती नुसार या लाटा कमी जास्त अंतराने नेहमीच उसळत असतात.
जर कोणत्या भावनेने हे उसळले तर शांत करायला लागते ते प्रेम याउलट ज्याचा उद्रेक व्हायला लागतो तो हट्ट. लोक बरोबर या उलट याला समजतात. आपलं मन खरतर एक स्क्रीन आहे ज्यावर दररोज वेगवेगळे प्रसंग दिसतात. ती नेहमी बदलत असते आणि खर तर बदलली पाहिजे कारण सगळे दिवस सारखेच नसतात. आज जे आहे ते उद्या नसेल कदाचित, किंवा आज जे नाही उद्या मिळेल, यात काहीच स्थिर नाही, स्थिर आहे ते मन आणि ते स्थिर ठेवण्याचे काम करते ते प्रेम.
लहानपणी एखादी वस्तू आवडली की आपल्याला ती हवी असायची मग त्यासाठी काही वाट्टेल ते करायचं, पण एखादी वस्तू अवडल्यावर तिची किंमत करून आपण ती आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला देतो, तो ही ती सांभाळून ठेवतो, हाच फरक आहे प्रेम आणि हट्टातला.
बरं आणखी एक उदाहरण, दुपारी मी झाडांना पाणी देता देता थोडं पक्षांना पण शेजारी ठेवते, त्यांनी ते प्यावं ही माझी इच्छा असते, ते माझ्या नकळत येतात आणि पाणी पिऊन उडून जातात.
दुसऱ्या दिवशी स्वतः हुन येतात, हाच फरक आहे प्रेमात त्यांची काळजी आहे म्हणून त्यांना मी पिंजऱ्यात बांधून ठेऊ शकत नाही किंवा पुन्हां पुन्हा येण्यासाठी बांधून ठेऊ शकत नाही त्या आपसूक येतात आणि सकाळसकाळी चिवचिवाट करतात.
प्रत्येकाने च प्रेमात असलं पाहिजे पण त्यात असलेला आनंद हा कोणत्यांही वस्तू किंवा माणसात नसावा, आपण इतरांना आवडू लागतो, कोणीतरी आपल्याला आवडू लागते खर तर हे ती व्यक्ती नसतेच त्यांचा स्वभाव असतो, मग जर तो स्वभाव बदलला तर काल आवडणारी व्यक्ती अचानक आवडेनाशी होते, जर ते प्रेम एक गोष्टीपर्यंत सीमित ठेवलं तर ती गोष्ट नाहीशी झाली की दुःख होत पण त्याला जर कोणत्या वस्तू किंवा व्यक्ती च्या ही पुढे नेलं तर आपोआप ही भावना जागृत होते, ज्या प्रमाणे घर समुद्र किनारी असेल तर लाटा येऊन ते उध्वस्त करणारच पण तेच घर जर एखाद्या स्थिर ठिकाणी असेल तर कितीही लाटा आल्या तरी आपलं घर स्थिर राहील, इथे आपलं घर म्हणजे मन आहे, ज्याचा आनंद हा कोणत्याही भौतिक सुखात नाही तरीही त्याला ते सगळं आनंदाने उपभोगता येते, कारण त्यात ही ते रमते.
ज्याप्रमाणे लहानपणापासून आई- वडिलांचे प्रेम मिळाले तरी आपण कधी तरी त्यापासून दूर जातो त्यात अडकत नाही तसाच जर प्रेमात राहायचं तर सार्वभौमिक राहावं, चुकलं तर वाट दाखवत ते प्रेम, खुपल तर काळजी करत ते प्रेम, आणि वाट वेगळी असली तरी त्यावर चालण्याचं बळ देतं ते प्रेम, जग राहाटी शिकवत ते प्रेम.
पण याउलट जे हवंय ते हट्टातलं प्रेम की, प्रेमातला हट्ट? परिस्थितीत, कोणत्याही थराला जाऊन मिळवणे हा हट्ट. प्रेमाला अदृश्य सीमा असतात. हट्टाला नाही. प्रेम द्यायला शिकवते तर हट्ट घ्यायला. प्रेम डोळे उघडते तर हट्टाने ते मिटतात. प्रेम माणसांना जोडते तर हट्ट ते तोडण्याचे काम करते. प्रेमात आपुलकी आणि आनंद आहे तर हट्टात अहंकार आणि असूया. त्यामुळं जर कोणाला जिंकायचं असेल तर प्रेम करा, अगदी स्वतः ला सुद्धा, कारण प्रेम अनंत आहे.
संकलन-अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण
( एम.ए.अर्थशास्त्र,पीएच.डी.(ap) )
एल.एल.बी.,पीजी.डी.आय.पी.आर*
सी.सी.डी.सी.अपार्मेंट पहिला मजला प्लाँट नं.०२ समर्थ काँलनी,हाँटेल पांचाली जवळ,प्रभात चौक,जळगाव
[email protected]