<
जळगाव : श्री जैन युवा फौंडेशनतर्फे रविवार दि. २६ जानेवारी रोजी सागर पार्क येथे एकदिवसीय “उद्योग उत्सव २०२०” हा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात लघु, युवा व नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले जाणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष दर्शन टाटीया यांनी गुरुवारी दिली.
मेळाव्याचे सकाळी १० वाजता जैन उद्योग समूह अध्यक्ष अशोक जैन, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी शाकाहार प्रणेते रतनलाल बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून फॅन्सी ड्रेस स्पर्धाही आयोजित आहे. दिवसभरात खाद्यपदार्थांचे स्टॉल राहतील. यात घरी बनविलेले, तसेच देश विदेशातील विविध खाद्यपदार्थाची चव जळगावकरांना मिळणार आहेत. ज्वेलरी, फॅशन, इलेक्ट्रोनिक्स वस्तू, घरी बनविलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ, पादत्राणे, मनोरंजनासाठी आनंद मेळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी सादर होणार आहेत.सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्यासाठी हा उत्सव जळगाववासियांना मार्गदर्शक ठरणार आहे.
याशिवाय परिवारासाठी विविध खेळ या ठिकाणी असणार आहेत. महिला उद्योजिका तसेच नवउद्योजकांना पुढे येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून या उद्योग उत्सवाचे आयोजन प्रथमच शहरात श्री जैन युवा फौंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे. मेळावा सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार असून जळगावकर नागरिकांनी परिवार आणि मित्रांसह येऊन उद्योग मेळाव्यात आनंद घ्यावा असे आवाहन फौंडेशनने केले आहे. पत्रकार परिषदेला संघटनेचे सचिव रितेश छोरीया, कोषाध्यक्ष पियुष संघवी, प्रविण पगारिया, सचिन राका, प्रवीण छाजेड, प्रणव मेहता, अल्पेश कोठारी, दीपा राका, स्वाति पगारिया, खुशबु टाटिया, सपना छोरिया, टीना संघवी, यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.