<
जळगाव-(जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस अर्थात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुक्रवार, 24 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेणार आहेत. या शपथ कार्यक्रमास सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, 25 जानेवारी, 1950 हा दिवस भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त हा दिवस देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असा भारत निवडणूक आयोगाचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होईल. मात्र, 25 जानेवारी, 2020 रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने हा कार्यक्रम शुक्रवार, 24 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी नमूद केले आहे.