<
अमळनेर-(प्रतिनीधी) – येथील रवींद्र सखाराम मोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आॅस्ट्रेलिया जवळील किंगडम आॅफ टोंगा येथील कॉमनवेल्थ व्हॅकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना पीएच.डी. (डॉक्टरेट) इन सोशल सर्व्हिस जाहीर करण्यात आली आहे.
कॉमनवेल्थ व्हॅकेशनल युनिर्व्हसिटीतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात नाविण्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तिंना पीएच.डी. प्रदान केली जाते. यावर्षीदेखील भारतातील ३० जणांना ही उच्च पदवी दिली जाणार असून त्यांपैकी रवींद्र मोरे यांना सामाजिक कार्याबाबत ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र मोरे यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी २०१३ मध्ये ज्ञानवर्धिनी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमिकरणाचे कार्य हाती घेतले आहे, शिवाय गेल्या विस वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना थेट विदेशातील कॉमनवेल्थ व्हॅकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे पीएच.डी. जाहीर करण्यात आली आहे. २ फेब्रुवारी, २०२० रोजी बँकॉक, थायलंड येथे आयोजित एका सोहळ्यात त्यांना ही उच्च पदवी दिली जाणार आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.