<
जळगाव(प्रतिनीधी)- वाघडु ता.चाळीसगाव येथील सौ. उषाबाई कन्हीलाल कुमावत हीस दि.२७-०४-२०१२ रोजी सकाळी ०८:३०वाजता तिचा पती कन्हीलाल मोतीलाल कुमावत याने चाळीसगाव येथील बापजी हॉस्पिटलमध्ये ८१% जळालेल्या अवस्थेत दाखल केले होते. कन्हीलाल हा स्वत: उषाबाईला विझवताना भाजला गेला होता. त्याच दिवशी दुपारी तिन वाजेचे दरम्यान उषाबाई हिचे मृत्युपूर्व जबाब नायब तहसीलदार तथा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट महेंद्र माळी व पीएसआय निलेश निकम यांनी नोंदले. त्यात उषाबाईने आरोप केला की, तिचे लग्न पती कन्हीलालसोबत दीड वर्षांपूर्वी झालेले आहे. काल दि.२६-०४-२०१२ रोजी रात्री बारा वाजचे सुमारास चाळीसगाव येथील नारायणवाडी भागातील तिचे मामसासरे दादाभाऊ कुमावत यांचे मुलीचे लग्न आटोपून पती कन्हीलाल कुमावत, सासु सखुबाई कुमावत, सासरा मोतीलाल भगाजी कुमावत, जेठ बन्सीलाल कुमावत तसेच भउर, ता. देवडा. जि. नाशिक येथे राहाणारी नणंद सौ. वंदना प्रताप कुमावत व नंदोई प्रताप कारभारी कुमावत हे वाघडु, ता. चाळीसगाव येथे परत आले. तिचा पती कन्हीलाल कुमावत म्हणाला की, “तु तुझ्या माहेरून मला गाडी घेण्यासाठी रु.५०,०००/- आणुन दे, नाहीतर तु तुझा विचार करून घे.” तेव्हा उषाबाई त्याला म्हणाली की, “तुम्ही वारंवार माझ्या आईवडिलांकडून पैसे मागतात, ते सुद्धा आपल्याप्रमाणेच गवंडी काम करतात, त्यांचेजवळ एवढे पैसे नाहीत, असे मी आपल्याला बरेच वेळा समजावून सांगितले आहे, तरी तुम्ही कशाला पैसे मागतात व मला त्रास देतात.” त्यावर कन्हीलालला राग येउन तो तिला शिवीगाळ व मारहाण करायला लागला. त्यानंतर त्याने चाळीसगाव येथुन तिचे मामसासरे दादाभाऊ कुमावत यांना बोलावले व ते आल्यावर त्यांनी सर्वांनी तिला शिवीगाळ केली व म्हटले की, “हिला वारंवार सांगुन देखील माहेरहून गाडी घेण्यासाठी पैसे आणण्यास नकार देते, हिला आता मारुनच टाकु.” असे म्हणुन पती कन्हीलालने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नणंद सौ. वंदना व सासु सखुबाई हिने तिचे दोन्ही हात धरले, सासरा मोतीलाल व मामसासरे दादाभाऊ कुमावत यांनी तिचे पाय धरले. नंदोई प्रताप याने घरातील रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतले व दीर बन्सीलाल याने तिला आगकाडीने पेटवून दिले. त्यामुळे ती मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागली, परंतु घराचे दरवाजे व खिडक्या आतुन बंद केलेले असल्याने तिचा आवाज बाहेर कोणालाही ऐकु गेला नाही. त्यावेळी उषाबाईने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पती कन्हीलालला धरुन ठेवल्याने तोही जळाला. त्यानंतर कन्हीलालने तिच्या व स्वत:च्या अंगावर पाणी टाकून दोघांना विझविले. नंतर नणंद सौ. वंदना, नंदोई प्रताप व मामसासरे दादाभाऊ कुमावत हे रात्रीच निघुन गेले. सकाळी आठ वाजता तिला व पती कन्हीलालला दवाखान्यात दाखल केले आहे. असे दोन मृत्यपुर्व जबाब नोंदवून झाल्यावर, त्या जबाबाच्या आधारे चाळीसगाव येथील पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०७, ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे सर्व सातही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला व त्यांना अटक झाली. त्यानंतर दि.०१-०५-२०१२ रोजी उषाबाईचा मृत्यू झाल्यामुळे सदर गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ समाविष्ट करण्यात आले.सदर खटल्याचे चौकशीकामी जळगाव सेशन्स कोर्टात सरकारपक्षातर्फे मयत उषाबाईचा मृत्यपुर्व जबाब नोंदविणारे नायब तहसीलदार तथा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट महेंद्र माळी व पीएसआय निलेश निकम, प्रेतावर पोस्टमार्टेम करणारे डॉ. सचिन कुमावत, तसेच मयत उषाबाईचे वडिल आनंदा गोपीचंद कुमावत, मावसा रामेश्वर भिकन कुमावत, मामी प्रतिभा बाळु कुमावत, त्याचप्रमाणे आरोपींचे शेजारी राहाणारें धनंजय अशोक शेलार, तपासी अंमलदार पीएसआय दुर्योधन इंगळे यांचेसह एकुण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती अविश्वासार्हता तसेच तपासकामातील तृटी आदी बाबींचा विचार होउन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याचे चौकशीकामी अॅड. वसंत आर ढाके यांनी आरोपींतर्फे बचावाचे काम पाहिले. त्यांना अॅड. प्रसाद व्ही ढाके, अॅड. सौ. भारती व्ही ढाके, अॅड. उदय एस खैरनार व अॅड. शाम बी जाधव यांनी सहकार्य केले.