<
मेहरूण येथे साई मंदिराचा १३ वा वर्धापनदिन ;“दरबार साईचा” कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भाविकांचा उदंड प्रतिसाद
जळगाव : साईबाबांचा दिव्य अवतार, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, सजीव देखावे तसेच साईबाबांच्या जीवनावर आधारित गीतांवर लावणी नृत्य अशा भक्तीमय वातावरणात “दरबार साईचा” कार्यक्रम गुरुवारी पहिल्या दिवशी स्मरणीय झाला. भारुड, गोंधळ, लावणी, नाटिका अशा विविध कलाप्रकाराद्वारे साईगोपाल देशमुख महाराज यांनी भक्तांना खिळवून ठेवले.
येथील मेहरूण परिसरातील श्रद्धेय श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त “दरबार साईचा” हा सुश्राव्य संगीतमय भक्तिगीतांचा कार्यक्रम दि. २३ ते २५ जानेवारीदरम्यान घेतला जात आहे. बीड येथील साईगोपाल देशमुख यांनी रात्री सहकाऱ्यांसह कार्यक्रम सादर केला. यावेळी साईबाबांच्या भक्तीचा जागर करण्यात आला. सुरुवातीला गणेश वंदना सादर झाली. साईबाबांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग तसेच बाबांचे शिर्डी मध्ये झालेले पवित्र आगमन याविषयीची माहिती देशमुख महाराज यांनी यावेळी दिली. तसेच साईबाबांचा श्रद्धा व सबुरी हा मोठा व मोलाचा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रसंगानुसार नाटिका देखील सादर करण्यात आली. यावेळी साईबाबा यांच्या वेशभूषेत गिरीश कुलथे यांनी भूमिका साकारली. यावेळी ‘मैली चादर लेकर द्वार तुम्हारे कैसे आऊ बाबा’ अशा विविध भक्ती गीतांवर शशिकांत सरोदे यांनी लावणी नृत्य सादर केले.
“दरबार साईचा” कार्यक्रमाचे हे बारावे वर्ष सुरु आहे. तबल्यावर सुरज चौधरी, ऑक्टोपडवर उमेश कांबळे, सिंथेसायझरवर शंभू सुतार, कीबोर्डवर किरणकुमार यांनी साथसंगत केली. प्रवीण गरुड, मयूर विसपुते यांनी प्रसंगानुरूप नृत्य व नाटिकेत सहभाग घेतला. यावेळी आ. सुरेश भोळे, नगरसेवक प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मेहरूण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
साईबाबा मंदिराचे तेरावे वर्ष
मेहरूण परिसरातील प्रसिद्ध साईबाबा मंदिराने एक तप पूर्ण केले असून तेरावा वर्धापनदिन मेहरूणचे ग्रामस्थ साजरा करत आहेत. २००७ साली ११ जोडपे पूजेला बसवून मंदिराची स्थापना करण्यात आली होती. साईबाबा भक्त सुरेश नाईक यांच्या प्रेरणेतून भक्तांनी मंदिर बांधले. याकरिता इंदोर येथील संदीप अग्रवाल यांनी ५ लाख ५० हजाराची मूर्ती दिलेली आहे. दर गुरुवारी संध्याकाळी महाआरती झाल्यावर महाप्रसाद वाटप केला जातो. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह परिसरातील राकेश लाड, बापू पाटील, सिद्धेश घुगे, राकेश वाघ, निलेश वाणी, किशोर सोनवणे, खन्ना महाराज, गोकुळ सोनार, प्रेम देवरे आदी भक्त मंदिराची देखभाल करीत आहेत. वर्धापनदिनानिमित्त साईबाबा मंदिरावर रोषणाई करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमात आज
शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते साई पालखी पूजन असून त्यानंतर लघुरुद्रभिषेक केला जाणार आहे. दुपारी महाप्रसाद वाटप केला जाईल. यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, राज्यमंत्री दर्जा प्राप्त गुरुमुख जगवाणी, आ.सुरेश भोळे, आयुक्त उदय टेकाळे, मनपाचे मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे यांचेसह मेहरूणच्या वोर्डातील चारही नगरसेवक विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन, शबानाबी सादिक खाटिक उपस्थित राहतील. भाविकांनी कार्यक्रमाला व महाप्रसादाला उपस्थिती द्यावी असे आवाहन साई परिवारासह मेहरूण येथील ग्रामस्थांनी केले आहे.