<
जळगाव : येथील जाखनीनगर भागातील रहिवासी मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे या तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत जात पंचायत प्रमुख व सदस्यांना प्रचलित सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत अटक करावी आणि दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावे या बाबतचे निवेदन शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगावने पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
शहरातील जाखनीनगर भागात कंजरभाट समाजातील मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी याकरिता पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची कार्यकर्त्यांनी भेट घेतली. तत्पूर्वी सकाळी मुंबईवरून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीवरून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र तेथे काहीही दाखल नव्हते. दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याने वेळेचे महत्व लक्षात घेत तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलाभ रोहन यांचेशी फोनवरून संपर्क साधत, घटनेची माहिती दिली. डॉ.रोहन यांनी तत्काळ यंत्रणेला सूचित करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाला पाठविले. त्यानुसार त्यात मानसीचा मृत्यू हा गळफास घेऊन झाल्याचे लक्षात आलेले आहे.
पोलीस अधीक्षकांची दुपारी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात, सदर तरुणीने कंजरभाट समाजातील जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा आम्हाला संशय आहे. सदर जमातीच्या जात पंचांची सखोल चौकशी करून मानसी उर्फ मुस्कानच्या आत्महत्येस कारणीभूत सर्व जात पंचांवर प्रचलित आपण सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१६ नुसार कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर घटनास्थळी कार्यकर्त्यांनी भेट दिली. परिस्थिती व घटनेचे प्राथमिक स्वरूप जाणून घेतले. यावेळी विश्वजीत चौधरी, अॅड. भरत गुजर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी..एस.कट्यारे अशफाक पिंजारी, जितेंद्र धनगर, अॅड.डी.एस.भालेराव, आर.एस.चौधरी उपस्थित होते.
घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी असून जातपंचायतीच्या जाचाविरोधात आगामी काळात जनजागृती करण्याचे नियोजन अंनिस करणार आहे. जातपंचायतीचा जाच, आंतरजातीय विवाहाविषयी कोणाला अडचणी येत असतील तर त्यांनी अंनिसकडे लेखी माहिती द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवून त्याची दखल घेतली जाईल अशी माहिती जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी यांनी दिली आहे.