<
सातारा-(प्रतिनिधी) – येथील घराबाबत केलेल्या हक्क सोड पत्र दस्ताची नोंद करुन तसा उतारा देण्यासाठी 1500 हजार रुपयांची लाच मागून ती खासगी व्यक्तीकडून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने भूमी अभिलेख कार्यालय, कराड येथे छापा टाकला. याप्रकरणी वर्ग- 2 च्या अधिकार्यासह एका खासगी व्यक्तीला अटक केली.
गोविंद सुभाष बेलवणकर (वय 47, रा.कार्वे नाका, कराड), ताजुद्दीन इब्राहिम शिकलगार (वय 71, रा. रेठरे बु. ता.कराड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील ताजुद्दीन शिकलगार हा खासगी व्यक्ती आहे.याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे कराड परिसरातील आहेत. तक्रारदार यांना घराबाबत केलेल्या हक्क सोड पत्र दस्ताची नोंद करुन तसा उतारा पाहिजे होता. यासाठी ते कराड कार्यालयातील गोविंद बेलवणकर याला भेटले. संबंधित कामासाठी तक्रारदार याला 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी सातारा एसीबी विभागात 20 रोजी तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.2 हजार रुपयांच्या लाचेबाबत तक्रारदार यांनी संशयितांना भेटून रक्कम कमी करण्याची विनंती केली असता 1500 रुपयांची तडजोड झाली. लाचेची रक्कम सोमवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम खासगी व्यक्ती ताजुद्दीन शिकलगार याने स्वीकारली. ही रक्कम कराड येथील मोकळ्या जागेत स्वीकरली. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. ट्रॅप झाल्याची माहिती पसरताच कराडमध्ये खळबळ उडाली.