<
रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्त केला उपक्रम
जळगांव(प्रतिनीधी)- देशाच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे सैनिक आपली जबाबदारी पार पाडत असतात त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने दळणवळण क्षेत्रात वाहनचालकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन महामार्ग पोलिस पाळधी चे स.पो.नी. सुनिल मेढे यांनी केले. कामानिमित्त कायमस्वरूपी घरापासून व आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वाहन चालक आणि वाहक यांचे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. त्या शिवाय माल भरणे व उतरवणे, रात्रभर वाहन चालविणे यांमुळे वाहन चालकांना ताण येऊन ते अनेक व्यसनांच्या आहारी जातात. ही बाब लक्षात घेऊन ट्रक चालकांना भेडसावत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाययोजना म्हणून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमीत्ताने महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाऊंडेशन कडून एमआयडिसी तील ट्रांसपोर्ट नगरातील सुमारे १५० वाहन चालकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, एड्स, सांधे व कंबर दुखी, डोळे तपासणी यांची तपासणी प्रामुख्याने करण्यात आली व तसेच मोफत औषधपुरवठा देखील यावेळी करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य असल्यास ते प्रगतीसाठी निश्चित मदत करते. असे प्रतिपादन मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले. यावेळी डॉ. शरीफ शेख बागवान, डॉ. इरफान खान, डॉ. सलीम शेख, डॉ. रेहान शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी स.फौ.ममराज जाधव,डॉ. शरीफ बागवान, गुलाब मनोरे, पो.हे.काँ. प्रदिप रणित, पंकज बडगुजर, पो.ना.पवन देशमुख, नितीन सपकाळे, समीर तडवी, अफजल तडवी, दिपक पाटील, हेमंत महाडिक, आदी पोलीस कर्मचारी व वाहन चालक संख्येने उपस्थित होते.