<
“दरबार साईचा” कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी भक्तीचा महासागर
जळगाव : साई बाबा तेरा नाम अमर..बाबा साई साई… अशा विविध भजनांच्या आधारे साईबाबा यांच्या जीवनातील उपदेश साईभक्तांनी शुक्रवारी रात्री साईगोपाल देशमुख महाराजांकडून ऐकलेत. अत्यंत सुश्राव्य, साईबाबांच्या काळात नेऊन ठेवणारे विविध प्रसंग यामुळे “दरबार साईचा” कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भक्तीचा महासागर बघायला मिळाला.
येथील मेहरूण परिसरातील श्रद्धेय श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त “दरबार साईचा” हा सुश्राव्य संगीतमय भक्तिगीतांचा कार्यक्रम दि. २३ ते २५ जानेवारीदरम्यान घेण्यात आला. बीड येथील साईगोपाल देशमुख यांनी रात्री सहकाऱ्यांसह दुसर्या दिवशी कार्यक्रम सादर केला. धावत आली वासुदेवाची स्वारी… या वासुदेव गीताने भाविकांना वेड लावले. विविध कलाकारांनी साईबाबांच्या काळातील तत्कालीन पेहराव, वेशभूषाद्वारा जिवंत अभिनय उभे करीत साईलीला कथन केली. भगवान कृष्ण व सुदामा यांच्या भेटीचे प्रसंग आणि भोर भये पनघट पे…या भजनावर राधाकृष्ण गीताने भक्तांना भगवान श्रीकृष्णाच्या काळात नेले. याशिवाय जागरण गोधळ, बहारदार भक्तीगीतांवरील नृत्य भाविकांना भक्तीमय करून गेले. साईगोपाल देशमुख महाराज यांनी साईबाबा यांचा मानवतेचा संदेश सांगत सर्वधर्मसमभाव ठेवावा असे म्हटले.
यावेळी पोलीस निरीक्षक अकबर पटेल, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, अमित जगताप, उमाकांत जाधव शिवसेना महिला आघाडीचे कार्यकर्ते शोभा चौधरी, मनीषा पाटील, ज्योती शिवदे, नगरसेवक प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मेहरूण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
शनिवारी सकाळी ग्रामस्थ चंद्रकांत लाडवंजारी यांचे हस्ते साई मंदिरात पालखी पूजन झाले. त्यानंतर लघुरुद्रभिषेक झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यासाठी मुकेश नाईक, राजेंद्र पाटील, महेश महाजन, योगेश घुगे, रामेश्वर पाटील, राकेश लाड, बापू पाटील, जितेंद्र विसपुते, सुनील नाईक, संजय लाड, किशोर सोनवणे, योगेश नाईक, राहुल सानप, विलास वाणी, योगेश लाडवंजारी, निलेश वाणी, प्रेम शिंपी, नामदेव वंजारी, सचिन कोळी, दीपक वाणी, गजानन पाटील, मदन वाणी, दिनेश नाईक, अभय चौधरी, प्रशांत वंजारी, खन्ना पाटील, कैलास जायभाये, विजय वाघ, देवेंद्र वाणी यांनी परिश्रम घेतले.
साईबाबा मंदिराचे तेरावे वर्ष
मेहरूण परिसरातील प्रसिद्ध साईबाबा मंदिराने एक तप पूर्ण केले असून तेरावा वर्धापनदिन मेहरूणचे ग्रामस्थ साजरा करत आहेत. २००७ साली ११ जोडपे पूजेला बसवून मंदिराची स्थापना करण्यात आली होती. साईबाबा भक्त सुरेश नाईक यांच्या प्रेरणेतून भक्तांनी मंदिर बांधले. याकरिता इंदोर येथील संदीप अग्रवाल यांनी ५ लाख ५० हजाराची मूर्ती दिलेली आहे. दर गुरुवारी संध्याकाळी महाआरती झाल्यावर महाप्रसाद वाटप केला जातो. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह परिसरातील राकेश लाड, बापू पाटील, सिद्धेश घुगे, राकेश वाघ, निलेश वाणी, किशोर सोनवणे, खन्ना महाराज, गोकुळ सोनार, प्रेम देवरे आदी भक्त मंदिराची देखभाल करीत आहेत. वर्धापनदिनानिमित्त साईबाबा मंदिरावर रोषणाई करण्यात आलेली आहे.