<
जळगाव- (जिमाका वृत्तसेवा) :- सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरु करता यावा. तरुणांनी रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराकडे वळावे, याकरीता केंद् शासनाच्यावतीने प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी व्हावी. याकरीता जळगाव जिल्हा मुद्रा कर्ज योजना समन्वय व प्रचार समितीच्यावतीने मुद्रा कर्ज योजनेचा चित्ररथ बनविण्यात आला आहे. या चित्ररथास आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
याप्रसंगी शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त उदय टेकाळे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखा अधिकारी श्री. कैलास सोनार, श्री. सुनील जोशी, श्री. अनिल सुर्यंवशी आदि उपस्थित होते.
या चित्ररथाच्या निर्मितीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. हा चित्ररथ जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये जाणार असून तालुक्यातील मोठ्या गावांमध्येही याद्या चित्ररथाच्या माध्यमातून मुद्रा कर्ज योजनेची जिल्हाभर प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.