<
जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मेहरूण परिसरातील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात चित्तथरारक कराटयांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी दाखविले. यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात येऊन संविधानाचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये विद्यालयात माजी नगरसेविका सुभद्राताई नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज कला,क्रीडा, सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, सचिव मुकेश नाईक, संचालक भागवत सानप, सुनील नाईक, रमेश चाटे, वासुदेव सानप, तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी, निस्वार्थ जनसेवा संघटनेच्या अध्यक्षा निशा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, सैनिक, शहीद भगतसिंग, भारतमाता, आदी स्वातंत्रसेनानी आणि देशसेवकांच्या वेशभूषा केल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्रसेनानी आणि देशसेवकांनी देशाविषयी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शासकीय परिपत्रकाप्रमाणे उपस्थितांसह विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. तसेच पर्यावरणविषयी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधून गांभीर्य दाखवून दिले.
यावेळी कराटे प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखविले. हाताने कौले तोडणे, छोट्या रिंग मधून उडी मारणे, अंगावरून दुचाकी नेणे, काठ्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर पवार व प्रज्ञा बोदडे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचालन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी तर कार्यक्रमाचे संयोजक मुकेश नाईक यांनी आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, जया पाटील, माधुरी सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.