<
एरंडोल(प्रतिनीधी)- प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापुर तालुका एरंडोल येथील ध्वजारोहणा पूर्वी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसह संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते नरेश शशिकांत पाटील, यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी नरेश पाटील यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना कपडे वही-पेन वाटप करण्यात आले. तद्नंतर शाळेच्या वतीने वार्षिक गुणगौरव व राष्ट्रीय बालिका सप्ताह निमित्ताने मुलींचा गौरव सोहळा तसेच शालेय सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. ग्रामपंचयतीमार्फत व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे व बक्षिसांचे वाटप करण्यात सांस्कृतिक स्नेहसंमेलन विद्यार्थी गुणदर्शन व ध्वजारोहण कार्यक्रमाच्या प्रसंगी पुंडलिक महाजन, नितीन पाटील, माजी सैनिक विजय महाजन, सुरेश भिल, सखाराम भिल, सुनील भिल, सुभाष भिल, राकेश माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी या आदिवासी वस्तीवर विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व शाळा विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट केले. संविधान उद्देश पत्रिका वाचन करण्यामागील भूमिका सांगताना संविधान हे राष्ट्र निर्मितीचा देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्ट्रीय ग्रंथ असून हक्क व संरक्षण सोबतच नागरिकांचे कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाची असून देशाचा राज्याचा संपूर्ण कारभार संविधानाच्या अंतर्गत चालतो हे समजावून सांगितले. वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो चांगल्या सादरीकरण यांना लोकांनी बक्षीस दिल्याचा आनंद असल्याचे म्हटले. आदिवासी संस्कृती देखील महत्वपूर्ण असून आदिवासी बोलीभाषेतील गाणे व बोली भाषा टिकविणे सर्वांची जबाबदारी असल्याचे म्हटले.सामूहिक कवायत संचलन वार्षिक स्नेहसंमेलन यामुळे आदिवासी वस्तीवर प्रजासत्ताक दिनी उत्साह संचारला होता. बेटी बचाव बेटी पढाव, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, आदी घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता. वाडीकिल्ला येथील नरेश शशिकांत पाटील यांनी त्यांच्या पत्नी कै. सिंधुबाई नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना कपडे वही पेन दिल्याने मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी त्यांचा तसेच त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र बहाल करून गौरव केला. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या लोकांची समाजव्यवस्थेला गरज असून सर्वांनी स्वतःला व देवाला पाहून आपल्या व्यक्तिगत जीवनात समाजहितासाठी प्रामाणिकपणे जे जे चांगले करता येईल ते ते करावे असे यावेळी किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.