<
जळगाव शहरासह तालुक्यातून तहसीलमध्ये येणाऱ्या सामान्य जनतेची पिण्याच्या पाण्याची गैरसोय
जळगाव-(चेतन निंबोडकर)-येथील तहसील कार्यालयात पाणी पिण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे शासकीय कामासाठी कार्यालयात येणार्यांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर कार्यालयातही काम करणार्या कर्मचार्यांनाही बहुतांश वेळा पिण्यासाठी पाणी नसते. जळगांव तहसील कार्यालय पाण्याअभावी कोरड पडलेली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. तालुक्यासह शहराचा गाडा हाकणाऱ्या तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्थाच नसल्याने येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांसह येथील कर्मचाऱ्यांचा घसा कोरडाठाक पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यासह शहराचा कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयात तर पाण्यासाठी काहीच केलं गेल्याचं दिसत नाही. पाण्याचा पत्ताच नसल्यानं येथे दूरवरून पायपीट करीत शासकीय कामासाठी आलेल्या सामान्य नागरिकांसह येथील कर्मचाऱ्यांना घोटभर पाणी मिळणे देखील मुश्किल झाले आहे। येथील तहसील कार्यालयात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे येथे शासकीय कामासाठी दुरवरुन येणाऱ्या नागरिकांसह येथील कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. या कार्यालयात शहरासह तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी पाय ठेवताच बाहेरुन आलेले सामान्य नागरिक पाणी शोधतात। पर्यायाने कार्यालयीन कामकाजाच्या वेळी येथील कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्याचा आधार घेऊन कार्यालयीन कामकाज पार पाडावे लागते. परंतु कामकाजासाठी कार्यालयात गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांच्या घशाला कोरड मात्र कायम राहते.
ज्या कार्यालयात काम आहे, त्या ठिकाणी पाणी कुठे मिळेल, अशी विचारणा करावी लागते. अशावेळी नागरिकांना तहसिल कार्यालया बाहेरील दुकानातच पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. अशी जळगांव तहसील कार्यालयाची सद्यस्थिती आहे सध्या हिवाळा आहे. पाहिजे त्या प्रमाणात तहान लागत नाही परंतु आता थोड्याच दिवसांनी जळगाव तापायला सुरवात होणार आहे. तेव्हा मात्र जळगाव ग्रामीण भागातून धापा टाकत येणार सामान्य माणूस पाणी पिणार कुठे असा प्रश्न मात्र निर्माण झालेला आहे. मागील वर्षी देखील अशीच परिस्थिती तहसील कार्यालयाची होती, मागील वर्षी उन्हाळ्यात तहसील कार्यालयात पाण्याचे जार लावण्यात आले होते. मात्र याचे बिल देखील कर्मचाऱ्यांच्या (स्वखर्चाने) सुपडा फंड मधून देण्यात आले, असल्याची माहिती समोर अली आहे. जिल्ह्याचे ठिकाण जळगाव सारख्या शहरासह तालुक्याचा कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हि मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.
“घोटभर पाण्यासाठी घ्यावा लागतो चहा“
जळगाव येथील तहसिल कार्यालयात शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना जर तहान लागली तर हॉटेलमध्ये सहज पिण्यास पाणी मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने चहा घ्यावा लागतो. चहा घ्यायचा असेल तरच हॉटेलमध्ये पाणी पिण्यास परवानगी देण्यात येते. त्यामुळे त्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
या सर्व परिस्थितीमुळे येथे येणाऱ्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण होते. प्रशासनाच्यावतीने येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथे शासकीय कामासाठी येणाऱ्या सर्व सामान्यांतून होत आहे. महसूल प्रशासन याबाबत लक्ष घालून जनसामान्यांसह तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करतील का?