Sunday, July 20, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पंजाबचा सिंह’ असे लोक ज्यांना अभिमानाने म्हणत त्या सिंहासारख्याच शूर असणाऱ्या लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2020
in लेख, विशेष
Reading Time: 1 min read
पंजाबचा सिंह’ असे लोक ज्यांना अभिमानाने म्हणत त्या सिंहासारख्याच शूर असणाऱ्या लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५

पंजाबचा सिंह’ असे लोक ज्यांना अभिमानाने म्हणत त्या सिंहासारख्याच शूर असणाऱ्या लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५ रोजी पंजाबातील लुधियाना येथील जगराव या गावी झाला. त्यांचे वडील राधाकृष्ण हे शिक्षक, लेखक होते. आपल्याप्रमाणे लालादेखील समाजसेवी व्हावा असे त्यांना वाटे. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके (जागराँ तहसील) या गावी जैन घराण्यात झाला. त्यांची आई (गुलाबदेवी) मूळची शीख होती. वडील लाला राधाकिशन हे फार्सी व उर्दू विषयांचे शिक्षक आणि मनाने इस्लामचे अनुयायी होते. धार्मिक सहिष्णुतेच्या वातावरणात वाढत असलेल्या लजपतरायांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे एल्एल्‌. बी. ही पदवी मिळविली (१८८६) आणि अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाली. पुढे १८९२ साली लाहोरला स्थायिक होऊन त्यांनी तेथे वकिली सुरू केली. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचे राधादेवी या हिस्सार येथील अगरवाल कुटुंबातील मुलीशी लग्न झाले (१८७७). त्यांना दोन मुलगे व पार्वती नावाची मुलगी होती. त्याकाळी जातीच्या भिंती तोडून समर्थ होऊन परकी इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आर्य समाजाची पंजाबी हिंदूंवर मोहिनी पडू लागली होती. लालाजींनाही त्याचे आकर्षण वाटले आणि ते सक्रिय आर्य समाजवादी झाले. अर्जविनंत्यांचे नेमस्त राजकारण चालविणाऱ्या काँग्रेसबद्दल त्यांना सहानुभूती वाटेना. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी हिरिरीने प्रचार केला; तथापि १९०४ मध्ये पंजाबी नावाचे पुढे विख्यात झालेले पत्र सुरू करून पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते काँग्रेस अधिवेशनास गेले. तेथे त्यांचा एवढा प्रभाव पडला, की ब्रिटिश जनतेसमोर हिंदी जनतेची कर्झनशाहीतील दुःखे व किमान राजकीय मागण्या मांडण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मुहंमद अली जिना आणि गो. कृ. गोखले यांच्याबरोबर लालाजींचीही निवड झाली. मे १९०५ मध्ये ते इंग्लंडला गेले; परंतु तेथील लोक स्थानिक प्रश्नांत एवढे मग्न होते की लालाजींच्या दौऱ्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट परतल्यावर बंगालची फाळणी जाहीर झाली.

अनेक वर्षे सत्तारूढ असलेला कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष निवडणुकीत १९०५ मध्ये हरला. नव्या उदारमतवादी पक्षाबद्दल काँग्रेसच्या नेमस्त नेत्यांना फार आशा होत्या. त्यामुळेच डिसेंबरच्या बनारस काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात गोखल्यांनी फाळणीला विरोध करूनही एकूण सौम्य भाषा वापरली. त्या वर्षी देशात दुष्काळ पडला होता व कर्झनशाहीमुळे लोक त्रस्त झाले होते, या कारणांसाठी ब्रिटिश युवराजांचे स्वागत करणाऱ्या पहिल्याच ठरावाला लालाजींनी तीव्र विरोध केला. त्यांना लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल यांसारख्या जहाल नेत्यांचाही पाठिंबा मिळाला. खुल्या अधिवेशनात या ठरावावरील चर्चेचे वेळी जहाल नेते अनुपस्थित राहिले. बंगाल फाळणी आणि कर्झनशाहीच्या निषेधार्थ लाखो लोकांचे भव्य निदर्शन करावे, ही मागणीही लालाजींनी केली. इंग्लंडमधील सत्तारूढ उदारमतवादी पक्षावर आणि विशेषकरून भारतमंत्री मोर्ले यांच्यावर श्रद्धा ठेवून नेमस्त नेते फाळणीविरोधी आंदोलन बंगालपुरते सीमित राखण्याची शिकस्त करीत होते. १९०६ मध्ये जहालांनी या धोरणाला सक्त विरोध केला आणि ब्रिटिश मालावर साऱ्या देशभर बहिष्कार टाकण्यासाठी प्रचाराची मोहीम उघडली. पुढील वर्षी लालाजींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न धसाला लावला. १८५७ च्या संग्रामाच्या सुवर्णजयंतीसाठीही त्यांनी लोकजागृती सुरू केली. कालवे आखल्यावर मोठ्या प्रमाणावर मोकळी पडलेली जमीन बाहेरच्या शेतकऱ्यांना काही अटींवर देण्यात आली होती. वीस-पंचवीस वर्षांनंतर त्यांच्यावर नवे निर्बंध लादणारे कॉलनायझेशन बिल पंजाब सरकारने संमत केले. त्याच वेळी तीन जिल्ह्यांतील पाणीपट्टी दिडीने वाढविण्यात आली. लालाजी आणि त्यांचे सहकारी अजितसिंग (हुतात्मा भगतसिंगांचे चुलते) यांच्या प्रचाराला जनतेने, शेतकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे पीडित निवृत्त सैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. १० मे १९०७ रोजी हजारो पंजाब्यांना घेऊन लाहोरचा किल्ला सर करून १८५७ ची सुवर्णजंयती साजरी करण्याची योजना लालाजींनी आखली आहे, अशी ओरड सरकारधार्जिण्या यूरोपीय पत्रांनी सुरू केली. पंजाब सरकारनेही बंडाची आवई उठविली. शेवटी आदल्या दिवशी म्हणजे ९ मे रोजी लालाजी आणि अजितसिंग यांना अटक करून मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. देशात आणि देशाबाहेर निषेधाची लाट उसळली. व्हॉइसरायने पंजाब कॉलनायझेशन बिलाला मंजुरी नाकारली. वाढीव पाणीपट्टी रद्द झाली. पंजाब शांत झाला. मात्र सरकारने वृत्तपत्रांची गळचिपी करणारे काळे बिल व (तथाकथित) राजद्रोही सभांना बंदी घालण्याचे बिल आणले. मोर्लेने वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यास संमती दिली नाही; पण राजद्रोही सभांवर बंदी घालण्यास हरकत घेतली नाही. सभाबंदीचा कायदा झाल्यावर तीनच दिवसांनी लजपतराय आणि अजितसिंग यांची सुटका झाली.
लालाजींना पंजाबचा सिंह म्हणून गौरविण्यात येऊ लागले. त्यांच्या कारावासाच्या काळात त्यांच्या अनेक अनुयायांनी सौम्य धोरण अवलंबून लोटांगणवादी भूमिका घेतली. त्याची दुःखद जाणीव त्यांना सुटकेनंतर झाली. काही शिखांनी तर अजितसिंग हे शीख नव्हतेच, असे पत्रक काढले. आर्यसमाजी नेत्यांनी आपले राजकारणाशी काहीही कर्तव्य नाही असे वारंवार घोषित केले. त्यामुळे महिन्याभराने भरलेल्या सुरत काँग्रेसचे अध्यक्ष व्हा, असा प्रस्ताव पंजाबबाहेरील जहाल नेत्यांनी मांडला. त्याला लालाजींनी संमती दिली नाही. हद्दपारीच्या कालात गोखल्यांनी सतत त्यांची बाजू मांडली असल्यामुळे आपले जहाल समर्थक आणि मवाळ गट यांच्यात तडजोड करण्याची त्यांनी शिकस्त केली. त्यामुळे मनाने व वृत्तीने जहाल पण शरीराने मवाळ गटात अशी सुरतला काँग्रेस दुभंगल्यावर लालाजींची अवस्था झाली. पुढील वर्षी गदरचे संस्थापक हरदयाळ आणि जहाल नेते खापर्डे व पाल यांच्यासह ते इंग्लंडला गेले. गदर क्रांतीचे प्रत्यक्ष संचालन करणारे लालाजींचे आप्त रामचंद्र पेशत्वरी त्यावेळी कारावासात होते. नवीन सुधारणा कायदा झाल्यावर लालाजी परत आले. गोखल्यांच्या भारत सेवक समाजाच्या धर्तीवर त्यांनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटी काढली. आर्य समाजाच्या दयानंद कॉलेजातील जहाल देशभक्तीचा भर ओसरलेला पाहून राष्ट्रीय कॉलेज काढले. महायुद्ध सुरू झाल्यावर ते आपले चिटणीस डॉ. हर्डीकर यांना घेऊन अमेरिकेस गेले. तेथे त्यांचे पैशाअभावी फार हाल झाले. शेवटी लोकमान्य टिळकांनी त्यांना १५,००० रुपये धाडले.
जालियनवाला बाग हत्याकांडाने व्यथित होऊन १९२० मध्ये लजपतराय परत आले. खिलाफत आंदोलनाला तात्त्विक विरोध असूनही त्यांनी जुळते घेतले. त्या सालाच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद सर्वानुमते त्यांना देण्यात आले. सैनिकांत बहिष्काराचा प्रचार करण्यासाठीच्या उच्च समितीवर लालाजींची नियुक्ती झाली. नोव्हेंबर १९२१ मध्ये त्यांना अटक होऊन शिक्षा झाली. प्रकृती खालावल्याने लवकर सुटका झाली. मोतीलाल, चित्तरंजन दास यांबरोबर ‘फेर’ गटात राहून त्यांनी स्वराज्य पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. खिलाफत आंदोलनात मलबारमध्ये माथेफिरू मोपल्यांनी भीषण दंगली केल्या व आक्रमक मुस्लिम जातीयवाद उफाळून आला. त्याची प्रतिक्रिया होऊन बऱ्याच राष्ट्रीय नेत्यांनी हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन केले. १९२५ च्या पहिल्या अधिवेशनाचे लालाजी अध्यक्ष होते. १९२६ नंतर स्वराज्य पक्षाने असेंब्लीवर बहिष्कार घातला. त्यात लालाजी सामील झाले नाहीत. मात्र पुढे जयकर, केळकर प्रभृती राष्ट्रीय पक्षातर्फे पुन्हा निवडून आले. १९२८ च्या फेब्रुवारीमध्ये केंद्रीय असेंब्लीत सायमन कमिशनवर सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता. तो बहुमताने संमत झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनीच निदर्शनाचे नेतृत्व केले. त्यातील जबर मारहाणीने ते आजारी पडले आणि त्यातच १८ तारखेला त्यांचा अंत झाला. महिन्याभरात भगतसिंग आदी क्रांतिकारकांनी साँडर्सची हत्या करून लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला.

सामाजिक सुधारणा व हरिजनोद्धार या बाबतींत लालाजींची तळमळ कधीच कमी नव्हती. त्यांच्या अनहॅपी इंडिया या विशेष गाजलेल्या ग्रंथावर आणि इतर लेखनावर मिळालेले दोन लाख रुपये त्यांनी या कार्यासाठी दान केले. देशाची व पंजाबची फाळणी १९४७ मध्ये झाली; पण १९२० च्या सुधारणांनंतर पंजाबमध्ये फाझली हुसेन सरकारने उघड उघड मुस्लिम-धार्जीणे व हिंदु-शीख विरोधी धोरण आचरले. त्याचा निषेध म्हणून १९२५ च्या हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना लालाजींनी प्रथमच जाहीरपणे पंजाबच्या फाळणीची मागणी केली होती.

– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तहसील कार्यालयातील कर्मचारी पिण्याच्या पाण्यापासून वंचित

Next Post

२८ जानेवारी १८९९ स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म.

Next Post

२८ जानेवारी १८९९ स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications