मेहरूण येथे साई मंदिराचा १३ वा वर्धापनदिन;“दरबार साईचा” कार्यक्रमाची पालखी सोहळ्याने सांगता
जळगाव : येड बाई लागलं मुरळीला…डोंगर हिरवागार…साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन… अशा विविध भक्तीगीतांवर भाविकांनी “दरबार साईचा” कार्यक्रमात एकच जल्लोष करित नृत्याचा आनंद घेतला. तीनदिवसीय कार्यक्रमाची साई मंदिर, मेहरूण येथे पालखी सोहळ्याने सांगता झाली.
मेहरूण परिसरातील श्रद्धेय श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त “दरबार साईचा” हा सुश्राव्य संगीतमय भक्तिगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. बीड येथील साईगोपाल देशमुख यांनी रात्री सहकाऱ्यांसह कार्यक्रम सादर केला. यामध्ये कालीमातेचा जागर हा सजीव देखावा सादर झाला. ओ काली महाभवानी…गीतावर कलाकाराने केलेले नृत्य भाविकांना स्तंभित करून गेले. साईबाबा यांचा पालखी सोहळा भाविकांना मंत्रमुग्ध करून गेला. तसेच समाधी सोहळा देखील भावपूर्ण झाला. यावेळी साईबाबांच्या जीवनकार्यावरील गीतांनी भाविकांना ठेका धरायला लावला. भाविकांनी साईगीतांवर ताल धरत जल्लोष केला. यावेळी मनपा आयुक्त उदय टेकाळे, माजी महापौर नितीन लढढा, उल्हास बाविस्कर, शरद शहा, सदाशिव जोशी, बी.एम.चौधरी, राजेश जाधव यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमामध्ये मेहरूण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
साईबाबा मंदिराचे तेरावे वर्ष
मेहरूण परिसरातील प्रसिद्ध साईबाबा मंदिराने एक तप पूर्ण केले असून तेरावा वर्धापनदिन झाला. २००७ साली ११ जोडपे पूजेला बसवून मंदिराची स्थापना करण्यात आली होती. साईबाबा भक्त सुरेश नाईक यांच्या प्रेरणेतून भक्तांनी मंदिर बांधले. याकरिता इंदोर येथील संदीप अग्रवाल यांनी ५ लाख ५० हजाराची मूर्ती दिलेली आहे. दर गुरुवारी संध्याकाळी महाआरती झाल्यावर महाप्रसाद वाटप केला जातो. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह परिसरातील राकेश लाड, बापू पाटील, सिद्धेश घुगे, राकेश वाघ, निलेश वाणी, किशोर सोनवणे, खन्ना महाराज, गोकुळ सोनार, प्रेम देवरे आदी भक्त मंदिराची देखभाल करीत आहेत. वर्धापनदिनानिमित्त साईबाबा मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती.