<
जळगाव परिमंडळ- विद्युत क्षेत्रातील कर्मचारी 24 तास ग्राहक सेवेत कार्यरत असतात. कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाच्या ताण-तणावातून विश्रांतीसाठी मनोरंजन आवश्यक आहे. त्याच हेतुने ‘विरंगुळा’चे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी मुख्य अभियंता मा. श्री. दिपक कुमठेकर यांनी केले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकुटूंब ‘विरंगुळा’चा आनंद लुटला.
जळगाव परिमंडळाच्या वतीने जळगाव मंडळातील कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘विरंगुळा’ मंगळवार दि.28 जानेवारी 2020 रोजी जळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात संपन्न झाला. याप्रसंगी जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.फारुख शेख, अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) श्री.चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नेमिलाल राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.अरूण शेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जादूगार अविनाश दुसाने यांनी जादुचे प्रयोगातून सर्वांना अचंबित केले. महावितरण कर्मचारी पाल्य स्वरांगी श्रावगी, धनश्री पाटील, मयुरेश रामकॅुंवर यांनी गीत-गायन तर हेमाक्षी पाटीलने नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. स्वरांगीच्या पियानो वादनाचे मुख्य अभियंत्यांनी कौतुक केले. महावितरण कर्मचारी मधुसुदन सामुद्रे, सचिन भावसार, सागर सदावर्ते, उमेश गोसावी यांनी फ्युजन नृत्य सादर करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
मुख्य अभियंत्यांनी गायिलेल्या एका मराठी गीताने कार्यक्रमात चैतन्य संचारले. अधीक्षक अभियंता श्री. मानकर यांनीही गीत सादर केले. महिला कर्मचारी रत्ना पाटील, रूता दहिभाते, पुनम थोरवे, यास्मिन तडवी, गोदावरी भांगरे, रिना बिस्वास, योगिता बोरसे, जमिला शाह, मीनू तांदळे या चमुने गरबा फ्युजन नृत्याचे धमाकेदार सादरीकरण केले. महावितरणचे कर्मचारी एस.के.पाटील, मोहन भोई, उज्ज्वल पाटील, एस.डी.चौधरी, मोहन गारूंगे, सचिन भावसार व मयुर भंगाळे यांनी हिंदी चित्रपट गीते, कविता सादर करीत कार्यक्रमात रंग भरले. त्यांनतर सरगम ऑर्केस्ट्राच्या गीत व नृत्यावर चिमुकल्यांसह कर्मचारी थिरकले. सुत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले.