<
सेक्स किंवा समागम ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. शरीराची गरज म्हणूनदेखील शरीरसंबंध ठेवले जाऊ शकतात. ती एक आदिम, मानवी प्रेरणा आहे. काहींना ती तीव्रपणे वाटते तर काहींना ती अजिबात वाटत नाही. आदिम काळापासून स्त्री, पुरुष एकमेकांकडे आकर्षित होऊन समागम करत आले आहेत. मानवी इतिहासाच्या पुढच्या टप्प्यावर लग्न किंवा विवाह या संकल्पना अस्तित्वात आल्या. सध्याच्या काळात लग्न हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. मात्र जर दोघा जोडीदारांची संमती असेल, आणि एकमेकांवर विश्वास असेल तर लग्नाआधी सेक्स करण्यात वाईट काही नाही. मात्र ही एक जबाबदार क्रिया आहे. त्याच्या परिणामांची माहिती आधीच असणं आवश्यक आहे.
लग्न हा एक सामाजिक रिवाज आहे. आजही अनेक समुदायांमध्ये स्त्री पुरुष एकत्र येतात, संसार करतात, मुलं जन्माला घालतात आणि हाताशी पुरेसा पैसा आला की मग लग्नाचा कार्यक्रम करतात. त्यामुळे लग्नाआधी का नंतर यापेक्षाही दोघांची इच्छा, संमती आणि जबाबदारीची जाणीव या बाबी जास्त महत्त्वाच्या आहेत.