<
जळगाव-(जिमाका) – राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करून देण्याची महत्वाची योजना प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाणी 26 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात शिवभोजन योजना सर्वप्रथम जळगाव शहरात आज दि. 26 जानेवारी पासून कार्यान्वित करण्यात आली. शहरातील जिल्हा रुग्णालय, साई मल्टी सर्विसेस, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने चालवलेले कैलास कोल्ड्रिंक्स, येथील शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.
याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपस्थित होते.
शिवभोजन केंद्रे शहरातील वर्दळीचे 8 ठिकाणे केले असून त्यासाठी 8 भोजनालयांची निवड करण्यात आली आहे. जळगाव शहरासाठी 700 थाळीचे उद्दिष्टे शासनाने ठरवून दिले आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या शिवभोजनासाठी भोजनालय चालकांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनात प्रत्येकी 30 ग्रॅम दोन चपात्या, 100 ग्राम एक वाटी भाजी, 150 ग्राम भात व 100 ग्रॅमची एक वाटी वरण समाविष्ट आहे. शिवभोजन थाळी दहा रुपयात देण्यात येत असून ही संबंधित भोजनालयात दुपारी 12 ते 2 या वेळेत मिळेल. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागांमध्ये प्रतिथाळी 50 रुपये एवढी असली तरी ग्राहकाकडून मात्र फक्त दहा रुपये एवढेच शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित रक्कम अनुदानस्वरूप शासनाकडून थेट संबंधित भोजनालय चालकांना वितरित करण्यात येईल.
शिवभोजनाचा आस्वाद घेणाऱ्या गरीब आणि गरजू जनतेची दररोज नोंद घेण्यासाठी शासनाने शिवभोजन मोबाईल ॲप विकसित केला असून भोजनालय चालक या ॲपद्वारे थाळी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवून फोटो अपलोड करतील. मोबाईल क्रमांक असल्यास त्याची देखील नोंद ॲपमध्ये घेण्याची सोय आहे. याद्वारे शासनास रोज किती थाळींचा खप झाला याची माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील गरीब आणि गरजू जनतेने शिवभोजन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.