<
मनपा, मजिप्रा, लोकप्रतिनिधी व कंपनी यांनी एकत्र बसून कामातील अडथळे दूर करायला प्राधान्य द्यायला हवे
जळगाव-(प्रतिनिधी) – शहरात सध्या सुरू असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम जैन इरिगेशनतर्फे केले जात आहे. हे काम रेंगाळल्याबद्दल कंपनीवर दोषारोप केला जात आहे, तो चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. जसा जळगावकरांना त्रास होतो आहे तसाच तो आमच्या सर्व सहकारी व त्यांचे कुटुंबिय यांना होत आहे. हे मान्य करायला हवे. मात्र, हे काम कोणत्या कारणांमुळे रेंगाळत आहे याची कारणे जनतेसमोर येत नाहीत म्हणून कामाविषयी गैरसमज पसरलेला आहे. मनपा, मजिप्रा, लोकप्रतिनिधी व कंपनी यांनी एकत्र बसून कामातील अडथळे दूर करायला प्राधान्य द्यायला हवे असा आग्रह अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जैन इरिगेशनतर्फे करण्यात आलेला आहे.
जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था, अमृत जलवाहिनीच्या चारीमुळे झालेले खड्डे या विषयावरून माध्यमांमध्ये टीकाटिपणी होत आहे. अमृतच्या कामामुळे काही रस्त्यांवर खड्डे झाले हे सत्य आहे. परंतु ज्या भागात अमृतचे कामच झालेले नाही अशा बहुतांशी रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात अमृतचे काम करणाऱ्या कंपनीवर ठपका ठेवणे चुकीचे आहे. शहराच्या रस्त्यांवर अमृतच्या चारीवर झालेले काही खड्डे वगळता इतर कोणतेही खड्डे हे अमृतच्या कामांमुळे झालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
अमृत योजनेचे काम निविदेतील अटी व शर्तीनुसार दोन वर्षात पूर्ण व्हायला हवे होते हे सत्य आहे. कामाला मंजुरी मिळाल्यानंतर ते गतीने सुरू झाले, मात्र निविदेतील अटी, शर्ती, यातील तांत्रिक अडचणी, बऱ्याच बाबींमध्ये नसलेली स्पष्टता आणि वाढीव कामासंदर्भातील वाढीव खर्च या विषयी वेळीच निर्णय झालेले नाहीत हे वास्तव आहे. अमृत योजनेचे काम सुरू झाल्यानंतर नियम व अटी संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावरील स्पष्टीकरणासाठी मनपा व मजिप्रा यांना कंपनीकडून वारंवार मार्गदर्शनासाठी व निर्णयासाठी पत्रे व स्मरणपत्रे दिली आहेत. जवळपास 30 वेगवेगळ्या विषयांवर अद्यापही स्पष्टीकरण मिळालेले नाही. यात हायवे क्रॉसिंग, व्हॉलची रचना, जलकुंभांचे दर, माती वाहतुकीचे दर इत्यादी अनेक मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत त्यामुळे कंपनीला प्रारंभीची कामातील गती टिकवून ठेवता आली नाही. असे देखील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
अमृतच्या निविदेतील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे या कामासंदर्भात वाद उद्भवल्यास तटस्थपणे निर्णय देऊ शकेल अशी स्वतंत्र यंत्रणेची तरतुद नाही. त्यामुळे प्रलंबित निर्णय प्रारंभी जसे होते तसेच आहेत. अमृत योजनेचे काम केंद्र, राज्य व मनपाच्या स्वफंडातून सुरू आहे, या कामावर नियंत्रक म्हणून मजिप्रा आहे. कामातील तांत्रिक अडचणींवर स्पष्टीकरण देण्याचे काम मजिप्राचे आहे. त्या सोबतच काही विवाद उद्भवल्यास मजिप्राच निर्णय देणाऱ्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे पूर्वी असलेल्या तांत्रिक अडचणी आजही जैसे थे आहेत. असे ही जैन इरिगेशन कडुन स्पष्ट करण्यात आले.
जैन इरिगेशन केवळ जळगाव व भुसावळ येथेच पाणी योजनांचे काम करीत आहे असे नाही, उलट देशभरात इतरही गावे आणि शहरांमध्ये 24×7 पाणी पुरवठ्याच्या योजना गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात आल्या आहेत. यात कर्नाटकातील नऊ पाणी पुरवठा योजनांची कामे जैन इरिगेशनने यशस्वीरित्या वेळेत पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना 24 तास पाणी मिळत आहे. जळगाव व भुसावळच्या अमृत योजनांसदर्भात जळगाव मनपा, भुसावळ नपा, मजिप्रा आणि तेथील लोकप्रतिनिधींनी एकत्र बसून तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य केले तर हा प्रश्न निश्चितच कालबद्ध पद्धतीने सुटू शकेल मात्र केवळ अपूर्ण माहितीच्या आधारे कोणावरही टिकाटिपणी करून तसेच दबावतंत्रामुळे काम आहे त्या स्थितीत राहील.
आमदार व महापौरांनी पुढाकार घ्यावा
जळगावच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम जैन इरिगेशनने आपले शहर, आपले नागरीक, आपली योजना या हेतुने घेतले. आपला जेथे जन्म झाला, आपण जेथे राहतो, जेथे आपला उद्योग आहे, जेथे आपल्या मातीतील माणसं आहेत तेथील काम उत्तमपणे करावे म्हणून हे काम हाती घेतले. मात्र, गेल्या दोन वर्षात निविदेतील त्रुटींमुळे व संबंधीत यंत्रणांच्या मर्यादीत अधिकारांमुळे तांत्रिक विषयावरील स्पष्टीकरण, सहकार्य वेळेत मिळाले नाही त्यामुळे काम रेंगाळले आहे. हे काम करतांना कोणताही नफा मिळविण्याचा जैन इरिगेशनचा हेतु नाही. आम्ही पाण्याच्या क्षेत्रात काम करतो. त्याच भूमिकेतून जळगाव शहरासाठीही पाण्याचा प्रत्येक थेंब नासाडी न होता नागरिकांपर्यंत पोहोचावा, त्यासाठी हवे ते अद्ययावत तंत्र वापरावे या हेतुने आम्ही काम करीत आहोत. आताही सर्वांचे सहकार्य मिळाले तर काम उत्तमपणे पूर्ण होईल हा विश्वास आहे. यासाठी जळगावचे खासदार, आमदार व महापौर यांनी पुढाकार घेऊन मजिप्रा, मनपा व जैन इरिगेशन यांची एकत्रीत बैठक घेऊन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. जेणे करून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करणे शक्य होईल. जैन इरिगेशन जळगाव चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.