Wednesday, July 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नरवीर तानाजी मालुसरे : महापराक्रमी अद्वितीय योद्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in राष्ट्रीय, लेख, विशेष
Reading Time: 1 min read
नरवीर तानाजी मालुसरे : महापराक्रमी अद्वितीय योद्धा

आपला शिवकालीन इतिहास तेजस्वी आहे. पूर्वजांच्या रक्ताचा, स्वाभिमानाचा, शौर्याचा, निष्ठेचा आणि शहाणपणाचा वारसाहक्क आपल्याकडे आहे. त्यांचा इतिहास जर आपण विसरत चाललो तर वर्तमानकाळापेक्षाही आपला भविष्यकाळ काजळलेला दिसेल हे सांगायला नको. शिवरायांचा सिंह पडला समरांगणी मराठा गडी यशाचा धनी असा गौरव इतिहासाच्या पानापानात सुवर्णाक्षराने शिवछत्रपतींच्या ज्या सुभेदाराचा झाला आहे त्या नरव्याघ्र नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्राला आणि मराठी मनाला आजवर सतत स्फूर्तिदायी ठरत आली आहे. नरवीर तानाजींनी भावनेपेक्षा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या कर्तव्यापेक्षा स्वराज्याची किंबहुना राष्ट्रकार्याची हाक ऐकली आणि हे करताना स्वामीकार्यासाठी स्वतःच्या रक्ताचा सडा शिंपडून प्राण अर्पण केले. अशा नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे या पराक्रमी दोन बंधूंच्या महान कार्याचे सिहांवलोकन शौर्यदिनी करणे हेच इतिकर्तव्य ठरणारे आहे. शिवकाळाच्या इतिहासाबाबत अनेक गोष्टी नव्याने पुढे येत आहेत. नवनवीन ऐत्याहासिक कागदपत्रे आणि साधने उपलब्ध होत आहेत, त्यामुळे जुने संदर्भ कालबाह्य ठरत आहेत. वादविवाद होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेली शिक्षण पद्धती लक्षात घेऊन वाडवडिलांनी जपलेला इतिहास आपल्या पुढच्या पिढीकडे संक्रमित होत राहणे गरजेचे असते.

आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे किंवा गड आला पण माझा सिंह गेला अशी इतिहासात झालेली नोंद म्हणजेच नरवीरांचा इतिहास नव्हे तर तानाजीवांच्या देदीप्यमान अद्वितीय तेजस्वी पराक्रमाची गाथा सांगणारा शाहीर तुलसीदासाने रचलेला शिवकाळातला पहिला पोवाडा आणि अशा इतर बर्‍याच प्रसंगांची नोंद इतिहासात आजही उपलब्ध आहे.

तानाजी क्षात्रकुलोत्पन्न मल्ल राजवंशीय कुळातील होता. अकराव्या शतकातील आपत्काळात मल्ल घराण्यातील एक शाखा कोकणात जावळी मुलुखात आश्रयास आली. त्या शाखेतील नाईक हा तानाजीचा हुद्दा असावा. प्रतापगड युद्धानंतर किल्ले राजगड आल्यानंतर शिवरायांनी तानाजीला तावून-सुलाखून पहिल्यानंतर पायदळाच्या हजारी मनसबदार केले. मात्र त्याच्या हाताखाली एक हजार पायदळ जेधे, बादलांसारखे एकाच बिराजरीचे नव्हते, तसेच एकाच मुलुखातील नव्हते. मोहिमेप्रसंगी सैन्याबरोबर एक हजार हशमांचे मिश्र पायदळ सुद्धा दिले जाई. तानाजी मालुसरे स्वराज्यातील कधीही कोणत्याही वतनी सुभ्यावर नियुक्त नव्हता. शिवाजी राजांच्या स्वराज्यात प्रत्यक्ष वतने देण्याचा प्रघात नव्हता. त्याच्या आधी सुभेदार हे उपपद लावले गेले. सुभेदार ह्या शब्दाचा अर्थ लष्करातील अधिकारी. सुभा म्हणजे प्रांत . पण तानाजीराव प्रांताधिकारी नव्हते. जेधे शकावलीत तानाजी मालुसरे यांच्या निधनानंतर नोंद आहे की,तान्हाजी मालुसरा राजश्रीकडील हशमांचा सुभेदार पडिला. कारण मराठी साम्रज्याच्या छोट्या बखरीत असा उल्लेख आहे की, तानाजीला जावळीच्या मोर्यांच्या मुलुखात कोणतेही वतन नव्हते. म्हणून तो शिवरायांच्या खड्या सैन्यात कायमस्वरूपी पगारी नोकरीत होता. म्हणूनच राजगडावरील सुवेळा माचीवर लष्करी सेनाधिकार्‍याच्या वस्तीसमूहात त्याचे घर होते.

तानाजीराव मालुसर्‍यांचे पूर्वज तापी नदीच्या उतारावर सातपुड्याच्या जंगल काठावरचे मूळचे राहणारे लढवय्ये म्हणूनच दौलताबाद व नंतर अहमदनगर व वाईला आले. शेवटी ते पांचगणीजवळील गोडोलीला येऊन राहिले. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी व त्यांचा भाऊ भोवरजी किंवा भोरजी हे गोडोलीचे रहिवाशी. या गोडोलीवर परक्यांची स्वारी नेहमीच येई. म्हणून काळोजी व भोरजी यांनी शिवाजी महाराजांचा पक्ष घेतला. आणि फत्तेखानाच्या स्वारीच्या वेळी त्याचे पारिपत्य करण्याची प्रतिज्ञा या दोन्ही भावांनी वाई जवळच्या आकोशी  व नालवाडी या गावी घेतली. आसगावच्या शिंगाण नावाच्या डोहाजवळ  झालेल्या सभेत या दोन्ही भावांनी विडे उचलले. वाईच्या सुभेदाराला ही बातमी लागली. त्याने गोडोलीवर अचानक हल्ला करून या दोन भावांचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. आणि एकाएकी एके रात्री विजापूरकरांचा वाईचा सुभेदार त्या गावात आला. त्याने त्या गावावर अचानक हल्ला करून संपूर्ण गाव बेचिराख करून काळोजी,भोरजी व गोडोलीच्या शूरवीर गावकर्‍यांची कत्तल केली. तानाजीच्या आईने आपल्या दोन मुलांना घेऊन ब्रम्हारण्याचा रस्ता धरला. भोरजीचे मुलगे त्याच्या मामांकडे कोयना खोर्‍यांत फुरस गावाला गेले. तर तानाजी व सूर्याजी या बारा व दहा वर्षाच्या मुलांना घेऊन त्यांची मातोश्री आसर्‍यासाठी  प्रतापगडाच्याखाली करंजे गावातून उमरठला आली. तानाजीच्या मातोश्रीने उमरठ गावाजवळच डोंगरात एक घळ आहे, त्यात शिळ्या भाकर्‍या खाऊन तीन दिवस काढले. 10-15 माणसे सहज बसतील अशी उत्तराभिमुख ही घळ अजूनही उमरठ लगतच्या डोंगराच्या उतारावर आहे. एक अबला आपल्या लहान मुलांना या ठिकाणी राहतेय हे गावकर्‍यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी या माऊलीला गावात आणले. तोपर्यंत तिचा भाऊ शेलार त्यांचा शोध घेत उमरठला पोहोचला होता. शेलारमामाने त्यांच्या वाट्याला आलेले दुःख गावकर्‍यांना सांगितल्यानंतर त्यांनी एक खोपट बांधून दिले आणि नाचणी,वरी पिकविण्यासाठी काही एकर वरकस जमीनही दिली. त्या उमरठ गावात  तानाजी-सूर्याजी आठ-दहा वर्षात गावचेच नव्हे तर साखर खोरे, कामथे खोरे, किनेश्वर खोरे, गोळेगणी खोरे, आणि शिवथर खोर्‍यातही प्रसिद्ध झाले होते. शरीर कमावण्यासाठी ते जोर जोडी, मल्लखांब करीत व दिवसभर काबाडकष्ट करीत. तरवार,भाला,बोथाटी चालवता चालवता तो समशेर बहाद्दर झाला. दांडपट्ट्याचे हात इतके सफाईने तो करी की पट्टा चालविणारे सराईत वेळ गडी त्याच्याकडे टकमक पाहत रहात. वेष पालटण्यातही तो तरबेज होता. कधी सरदारी  पोशाखात तो आपल्या जाडजूड काळ्या मिश्याना पीळ घालून बसला म्हणजे त्याचा थाट सरदारी दिसे. गोंधळी म्हणून गेला म्हणजे ओंगळ वंगाळ अडाणी दिसे. दोन्ही भाऊ शेती करीत अन लढाईचे डावपेच शिकत महाड प्रांतात मोठे प्रख्यात झाले.

अफझुलखानाच्या स्वारीच्या वेळी तानाजीचे मावळे करंजे-देवळे व गोळेगणि-पैठणच्या खोर्‍यात सशस्त्र तयार होते. तानाजी प्रतापगडावरच भेटीचा सर्व प्रकार दिसेल अशा ठीकाणी बसलेला होता. खानाचा कोथळा बाहेर येऊन तो कोसळल्यानंतर  सय्यद बंडा भेटीच्या जागी तिरासारखा धावत गेल्यावर तानाजीही धावत गेला. संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला व तानाजीने खानाचा चेंदामेंदा  टाकला. खानाच्याच ताकदीचा तानाजी यावेळी धावत आला नसता  तर काय झाले असते हे कळण्यासारखे नाही असे कॅ मोडक यांनी प्रतापगडाचे युद्ध या पुस्तकात आहे. तानाजीने जावळी खोर्‍याच्या खाली असलेल्या या खोर्‍यात तरुणांची जी एकजूट केली त्यामुळे सन 15 जानेवारी 1656 या दिवशी जावळीचा पाडाव झाला. त्यामुळे शिवरायांचे काम सोपे झाले,जावळी पूर्णपणे ताब्यात येऊन गुढ्या डोंगराच्या जुन्या गढीचे स्वरूप प्रतापगडात कऱण्यात आले.

तानाजीचा मुलगा रायबा (रायाजी) संभाजी महाराजांबरोबर असे. म्हाळसोजी या संताजी घोरपड्याच्या आजाबरोबरच्या सैन्यात तो नेहमी असे. तानाजीच्या मृत्यूनंतर सूर्याजी त्याच्या कलेवारासह वेल्हाची पेठ, ढोणीचे पाणी, बिरवाडी,भावे या गावावरून उमरठला आला आणि तेथेच राहिला. सूर्याजींचे तीन मुलगे होते. कान्होजी उमरठला राही. भोरजी कडोशी या महाबळेश्वरा पलीकडे असलेल्या गावी राहावयास गेला. तर नाईकजी  हा उमरठच्या पायथ्याशी असलेल्या साखर येथे राहू लागला. तानाजीच्या चुलत्याचा म्हणजे भोरजीचा वंश फुरुस या कोयना काठच्या गावाला आहे. त्याचप्रमाणे मालुसर्‍यांचे वंशज साखर, धाकटी वाकी,गावडी, किंवे, आंबेशिवथर, कसबे शिवथर, गोडवली, पारमाची,पारगड, या गावात आजही राहतात.

तानाजीचे दहन उमरठला झाले त्याबाबतचा एक पोवाडा काही गोंधळी म्हणून दाखवितात. गडावरून पालखीतून तानाजीचा देह येल्याची पेठ, ढोणीचे पाणी व बिरवाडीतून सरळ साखर खोर्‍यात बोरज वरून उमरठला नेऊन शिवछत्रपती व जिजाबाईंच्या आगमनानंतर त्याला अग्नी देण्यात आला ही गोष्ट सत्य आहे. बाकीच्या वीरांचे देह दहन गडावर झाले असावे व म्हणूनच सतीचे दगड त्या जुन्या वृन्दावना सभोवार आहेत. सन 1935 साली पुण्यात एक उत्सव मंडळही स्थापन झाले. व आजही ते आहे. या मंडळाने आता बांधलेली समाधी, अर्ध पुतळा व त्यावर मेघडंबरी व सभोवार कठडा या स्वरूपाची आहे. वस्तूत: हा इतिहास यापूर्वीच पेणचे इतिहास संशोधक परशुराम दाते यांच्या 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील पुस्तकात उल्लेखित आहे.

आज पोलादपूर तालुक्यात उमरठ येथे तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पावित्रातील 6 फूट उंचीचा भव्य पुतळा आहे. तर जवळच साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. साखर येथील तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि उमरठ येथील कळंबे मंडळी 1930 पासून उमरठ येथे माघ वद्य नवमीला आजतागायत नतमस्तक होत पुण्यतिथी साजरा करीत आली आहे.यावर्षी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी समाधी मेघडंबरीचे आणि परिसराचे सुंदर नूतनीकरण केले आहे, त्याचे लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह मंत्रीगण उमरठ येथे येत आहेत. इथेच सुभेदार तानाजीरावांचे चरित्र संपले….पण त्यापासून स्फूर्ती घेत गेल्या 400 वर्षात अनेक असेच लढवय्ये आपल्या हिंदुस्थानात निर्माण झाले. तानाजीरावांच्या चरित्रात एव्हढी ताकद आहे कि, स्वातंत्रवीर सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना जनता पेटून उठवी यासाठी तानाजीच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला, या पोवाड्यातून गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हा देश पेटून उठेल हे लक्षात येताच इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली….. यंदाच्या 350 व्या सिंहगड महापराक्रमाच्या शौर्यदिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील मालुसरे एकत्र होऊन सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे सामाजिक संस्था निर्माण केली आहे, आणि पराक्रमाची विजयगाथा हा नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांच्या अद्वितीय पराक्रमाची नोंद असलेला एक ग्रंथ ते प्रकाशित करणार आहेत. महाराष्ट्रातील मान्यवर इतिहासाचे अभ्यासक,लेखक सुभेदाराच्या इतिहासाला या ग्रंथाद्वारे पुन्हा उजाळा देणार आहेत. तानाजीरावांचे चरित्र कितीही गायिले तरी थोडेच. आणि त्यातील थोडे जरी आचरले तरी पुष्कळच.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष –  
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117707

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे विविध धोरणांच्या नियोजनासाठी संबंधितांनी सहकार्य करावे

Next Post

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली खलनायिका होण्याचा मान मिळविणार्‍या कुलदीप कौर यांचा आज स्मृतिदिवस

Next Post

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली खलनायिका होण्याचा मान मिळविणार्‍या कुलदीप कौर यांचा आज स्मृतिदिवस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications