<
आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने ओळखल्या जाणार्या वहिदा रहमान यांनी हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बंगाली चित्रपटातून भूमिका करत 50, 60 आणि 70 अशी तब्बल तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. त्यांच्या या कारकिर्दीकरिता त्यांना 2013 मध्ये भारतीय चित्रपटातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा शताब्दी पुरस्कार व फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवार्डने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या या कारकिर्दीत एकदा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार व दोन फिल्मफेअर अॅवार्ड त्यांच्या नावे आहे.
वहिदा रहमान यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 ला परंपरागत मुस्लिम परिवारात झाला. लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे त्यांचे स्वप्न होते पण फुफ्फुस्सात झालेल्या इफेक्शनमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला आणि त्या डॉक्टर होऊ शकल्या नाहीत. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई आणि मुंबई येथे गुरु जयलक्ष्मी अल्वा यांच्या कडून घेतले होते. भरतनाट्यम् शिकणार्या वहिदा यांना त्यांच्या गुरुंनी अभिनय करण्याची प्रेरणा दिली. आपल्या करिअरची सुरुवात १९५५ मध्ये ‘राजूला मरायी’ या तेलगु चित्रपटापासून केली व या चित्रपटात त्यांना यशही मिळाले. रुपेरी पडद्यावरील वाटचाल तेलगू चित्रपटाने झाली असली तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सीआयडी या चित्रपटातून पर्दापण केले. पण भूमिका खलनायिकेची होती. तामिळ सिनेमातील वहिदा यांचा जबरदस्त अभिनय बघून गुरुदत्त भारावले होते. अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वहिदा यांना कमी वयामुळे चित्रपटाच्या करारावर सहीदेखील करण्यास कायद्याने मुभा नव्हती. परंतु, गुरूदत्त यांच्या नाव बदलण्याच्या सल्याला त्यांनी खंबिरपणे नकार दिला. यात त्यांच्यासोबत गुरुदत्त होते.
गुरुदत्त आणि वहिदा यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. त्यांनी प्यासा, कागज के फूल, चौदहवीं का चांद, साहिब – बिबी और गुलाम यासारखे अनेक चित्रपट सोबत केलेत. या दरम्यान त्यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चाही चित्रपटसृष्टीत होती पण 10 ऑक्टोबर 1964 ला गुरुदत्त यांनी आत्महत्या केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. यानंतर वहिदा यांनी आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत केले. परिणामस्वरुप 1965 मध्ये गाइड या चित्रपटातील भूमिकेकरिता फिल्मफेअर अॅवार्ड मिळाले. गाईड’नंतर १९६८ मध्ये रिलीज झालेल्या ‘नीलकमल’ या सिनेमाने वहीदा यांना यशोशिखरावर पोहोचवले.
1974 ला सहअभिनेता कमलजीत यांनी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि वहिदा यांनी तो स्वीकारला. चित्रपट कारकिर्दीच्या यशोशिखरावर असताना त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांनी हातातील चित्रपट पूर्ण केले, त्यानंतर चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला विराम दिला. लग्नानंतर वहीदा बंगळूरूमध्ये स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुले आहेत. अनेक वर्षे सिनेमांमधून ब्रेक घेतल्यानंतर १९९१ साली ‘लम्हे’ या सिनेमाद्वारे त्या मोठ्या पडद्यावर परतल्या. 2000 मध्ये पती कमलजीत यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत वाटर, रंग दे बसंती, मैने गांधी को नही मारा, दिल्ली 6, विश्वरुपम 2 या चित्रपटातून काम केले.
वहीदा रहमान यांना भारत सरकारने १९७२ साली पद्मश्री आणि २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. वहीदा रहमान यांना गाईड व नील कमल या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार व रेशमा और शेरा या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)