Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तानाजी मालुसरे या नरवीराचा आज 4 फेब्रुवारी रोजी बलिदान दिवस

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in राष्ट्रीय, लेख
Reading Time: 1 min read

तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर! आज 4 फेब्रुवारी या नरवीराचा बलिदान दिवस.

सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. गोडवली हे गाव पाचगणीपासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर आहे. शिवकालामध्ये वाई ते प्रतापगड हा रस्ता याच गोडवलीमार्गे जात होता. जावली खोऱ्याचे हे प्रवेशद्वार असून येथूनच पुढे जावलीच्या घनदाट अरण्यास प्रारंभ होतो. येथील मूळ रहिवासी असलेले मालुसरे हे अतिशय लढवय्ये व शूर होते. गोडवली, खिंगर, आम्रळ, राजपुरी, महाबळेश्वर ते थेट मालुसर गावापर्यंत मालुसऱ्यांची सत्ता होती. काळोजी मालुसरे व भवरजी मालुसरे या दोन शूर सरदरांकडे ही चाळीसगावची सत्ता असताना आदिलशहाने जावलीवर केलेले आक्रमण थोपवण्यासाठी त्यांनी शर्थीची झुंज दिली आणि त्यातच त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. काळोजी मालुसरे यांच्या तानाजी व सूर्याजी या मुलांना कोंढाजी रामजी शेलार (शेलारमामा) यांनी घेऊन उमरठा हे गाव गाठले. सोबत आपली बहीण व तानाजीची आई पार्वतीबाई यांनाही उमरठ्याला आणले. गोडवली येथील ग्रामदैवत काळेश्वरी हिच्या नावावरुन तानाजी मालुसरे यांच्या वडिलांचे काळोजी असे नामकरण करण्यात आले तर तानाजींचे नामकरण पुरातन मंदिर तपनेश्वराच्या नावावरुन तानाजी असे करण्यात आले तानाजी मालुसरे हे आपल्या मामासोबत राहताना उमरठा येथे मोठे झाले आणि तेथेच स्थायिक झाले.

छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे! तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

जून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या.

जे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते, जे किल्ले कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रूहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते. मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही.शिवाजी महाराजांना देखील जिजाऊ आईसाहेबांच्या मनातील सल कळत होती, परंतु त्यांचा देखिल नाईलाज होता. मोघलांच्या प्रचंड मोठ्या संरक्षण कवचामुळे कोंढाणा परत मिळवणे वाटत होते तितके सोप्पे नव्हते. परंतु मातेच्या हट्टासमोर राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा प्रण केला.शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे कोंढाणा जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते, परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजांच्या मनात एकाच वीराचे नाव आले- तानाजी मालुसरे!

तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी देखील तानाजींनी असीम शौर्य दाखवले होते.

शाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी जेव्हा महाराज १०-१२ विश्वासू साथीदारांना घेऊन लाल महालात घुसले होते त्या १०-१२ जणांमध्ये देखील तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी तानाजींचा पराक्रम प्रत्येक वेळेस जवळून पाहिला होता त्यामुळे कोंढाणा फत्ते करण्याचा पराक्रम केवळ तानाजी करू शकतात याची त्यांना खात्री होती.तानाजी हे बारा हजार हशमाचे (पायदळ) सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पांच कर्ण्यांचा मान होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी तानाजींना तातडीने बोलावणे धाडले तेव्हा तानाजी उमरठे गावात आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. परंतु आपल्या राजाचे बोलावणे आल्याबरोबर हातची सर्व कामे सोडून त्यांनी थेट राजांची भेट घेतली.

त्यांच्या सोबत शेलारमामा आणि बंधू सूर्याजी देखील होते. महाराजांनी आपला मनसुबा तानाजींना बोलून दाखवताच तानाजी धन्य झाले. महाराजांनी अत्यंत कठीण प्रसंगावेळी आपली आठवण काढली या पेक्षा मोठे भाग्य ते काय या विचाराने त्यांची छाती गर्वाने फुलून गेली.त्यावेळेस शेलार मामांनी सांगितलें की, आधी लग्न उरकून घेऊ. मग कामगिरीसाठी निघू. तेव्हा तानाजींनी उत्तर दिले, आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे. महाराजांची भेट घेतल्यावर तानाजी जिजाऊ आईसाहेबांना जाऊन भेटले. जिजाई आईसाहेबांनी देखील तानाजींना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तानाजींनी आपला मुलगा रायबाची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या हाती दिली आणि म्हटलें की, जर कोंढाण्याहून परत आलो तर मी त्याचे लग्न लावून देईन, जर मेलो तर तुम्ही त्याचे लग्न लावून द्या.

माघ वद्य अष्टमीला ४ फेब्रुवारी १६७० रोजी रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. सिंहगडावर उदयभान नावाचा अतिशय शूर सरदार तैनात होता. हा उदयभान मूळचा राठोड रजपूत होता पण पुढे बाटून मुसलमान झाला होता. त्याच्या हाताखाली रजपूत सैन्य देखील बरेच होते.

तानाजी आपल्या सैन्यासह गडाच्या कल्याण दरवाज्याखाली आले. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. तानाजींनी कोंढाण्यावर जाण्याचासाठी एक मार्ग निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा! हा कडा उभा तुटलेला होता. त्यास साखळी, दोराची शिडी लावून तटावर चढता येणे शक्य होते. तानाजींनी आपल्या साथीदारांसह किल्ल्यावर प्रवेश केला आणि शत्रू सैन्याला कात्रीत पकडले. पुढे दरवाजावर आपले लोक असावेत म्हणून तानाजींनी पुणे बाजूकडील पहिल्या दरवाजावर जाऊन तेथील पहारेकर्‍यांवर अचानक हल्ला केला त्यांना कापून काढले.

दरवाजा ताब्यात घेतल्यावर दुसर्‍या व तिसर्‍या दरवाजांवर जाऊन तेथील पहारेकऱ्यांना यमसदनी पाठवून ते दरवाजे देखील ताब्यात घेतले. या अनपेक्षित गडबडीमुळे किल्ल्यावरील शत्रूची फौज जागी झाली. एव्हाना उदयभान देखील भानावर आला आणि त्याने सैन्य जमवण्यास सुरुवात केली. गडाचा सरनोबत सिद्दी हलाल हा सर्वप्रथम तानाजींना सामोरे गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि त्यात सिद्दी हलाल पडला. ज्या साखळदंडाच्या सहाय्याने मराठे सैन्य गडावर चढत होते, तो तुटल्याने सर्वजण सुर्याजीच्या नेतृत्वाखाली गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ जमले आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले.
तानाजी हळूहळू कल्याण दरवाज्याकडे सरकत होते. इतक्यात उदयभानाने सर्व शक्तीनिशी तानाजींवर हल्ला केला. रात्रीचा प्रवास, किल्ल्यावर चढाई-हल्ला आणि मुख्य म्हणजे मोहीम फत्ते करण्याचे दडपण या गोष्टींमुळे तानाजी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. याउलट उदयभान मात्र ताजातवाना होता. उदयभानाच्या जोरदार हल्ल्यामुळे तानाजींच्या शरीरावर जखमा झाल्या त्यांची ढाल देखील तुटली, परंतु अश्या परिस्थितीत हार न मानता शेल्याने आपला हात बांधून त्यावर ते उदयभानाचे वार झेलीत होते. परंतु नियतीला जणू तानाजींचा हा पराक्रम बघवत नव्हता आणि उदयभानाच्या एका जबरदस्त वाराने त्यांच्या प्राणांचा ठाव घेतला आणि तानाजी धारतीर्थी पडले.

पण मरता मरता त्यांनी असंख्य शत्रूंना कापून काढले आणि आपल्या मावळ्यांसाठी पुढील वाट मोकळी करून दिली होती. आपले सुभेदार पडल्याचे पाहूनही ८० वर्षांचे शेलारमामा खचले नाहीत, त्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्वेषाने लढत ते कल्याण दरवाज्यापर्यंत येऊन पोचले. दरवाज्याजवळ पोचताच त्यांनी तेथील पहारा कापून बाहेर असलेल्या सूर्याजीला आणि इतर मावळ्यांना आत घेतले.सैन्याचा धीर खचू नये म्हणून तानाजी पडले ही वार्ता शेलार मामांनी मुद्दामच गुप्त ठेवली आणि पुढे सूर्याजीने उदयभानासह त्याच्या संपूर्ण सेनेचा फडशा पाडीत कोंढाणा ताब्यात घेतला. एका रात्रीत मराठ्यांनी स्वराज्याचे मौल्यवान रत्न ताब्यात घेतले. सूर्याजीने गवताच्या गंजीस आग लावून पाच तोफा केल्या, त्या महाराजांनी ऐकल्या. गड सर झाल्याचा तो संकेत होता.

महाराजांना अत्यानंद झाला. या यशाची खुप मोठी किंम्मत शिवरायांना मोजावी लागली.माघ वद्य नवमिची सकाळ उजाडली व त्या दुर्गराज राजगडाच्या सुवेळा माचीवर मृत गणांनी कुंकवाचा सडा टाकला. आवघा राजगड नव्हे मावळ रडला. तिन्ही माच्यांनी शेला तोंडात दाबला.आऊसाहेबांचा लाडका तान्हा धारातिर्थी पडला.अशाप्रकारे, हा पराक्रम त्या सिंहगडावर घडला.तान्हाजींसह पन्नास मावळ्यांनी स्वराज्याच्या आग्निकुंडात स्वत: शरीराराची आहुती दिली.तो किल्ले कोंढाणा या नृसिंहाच्या बलिदानाने “किल्ले सिंहगड”नामाभिधान पावला. सिंहगडावरील मातीचा कण न कण व रणवीराची जात सांगणार्‍या नरशार्दुलांच्या रुधिराबिंदूंनी ती माती पावन झाली.

– योगेश शुक्‍ल (9657701792)

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सय्यद यांचे कुटुंबीयांना 25 हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश

Next Post

रोटरी क्लब जळगांव स्टार्स तर्फे विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप

Next Post

रोटरी क्लब जळगांव स्टार्स तर्फे विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications