<
जळगाव : आपल्या देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे अनेक प्रकार रोज घडत आहेत. त्यांचे शारीरिक, मानसिक शोषनांच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि या सर्वांना कुठेतरी थांबविणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा विदारक परिस्थिती मध्ये युवतींना योग्य दिशा मिळावी, त्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना म्हणजेच एसडी सीड तर्फे “स्मार्ट गर्ल” (युवती सशक्तीकरण) या दोन दिवसीय मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालय जळगाव येथे नुकतेच करण्यात आले होते.
महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत युवतींसाठी आयोजिलेल्या या शिबिरात तज्ञ मार्गदर्शक श्री रत्नाकर महाजन, हिंगोली यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दोन दिवसीय शिबिराला संस्थेचे अध्यक्ष व एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड सदस्य डॉ. आर.एस. डाकलिया, माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. माया अंबटकर, शिशुविकासच्या सौ. मुक्ता पाटील, एसडी-सीड समन्वयक श्री. प्रवीण सोनवणे हे उपस्थित होते.
सूत्र संचालन श्री. गिरीश जाधव यांनी केले तर आभार सौ. अनिता शिरसाठ यांनी मानले.
या शिबिरात महाजन यांनी दोन पिढ्यांमधील वाढता दुरावा, संवादाचा अभाव, मैत्रीचे चांगले-वाईट परिणाम, मुली-मुलांमधील शैक्षणिक विकासातील तफावत, वैवाहिक जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शनाचा अभाव, आंतरजातीय विवाह, घटस्पोटाची वाढती संख्या, मोबाईल व इंटरनेट चा वाढता प्रभाव आदी विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनी बरोबरच त्यांच्या पालकांशी देखील हितगुज केले.
एसडी-सीड मागील बारा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.
हे शिबीर यशस्वी होण्याकरिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सूर्यवंशी आणि विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.