<
पुणे-प्रतिनिधी -(वारजे माळवाडी) : कात्रज- देहुरोड पश्चिम बाह्यवळण महामार्गावर बावधन येथे एसटी (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या) बसला अचानक आग लागली. चालत्या बसला आग लागली असून यामध्ये बस जळून खाक झाली आहे. चालकाने प्रसंगावधान साधून तातडीने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. अवघ्या काही मिनिटातच बस पूर्णपणे जळून खाक झाली.
ही घटना मंगळवारी संध्याकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महंमद उस्मान इनामदार (वय ५६, रा. रांजणगाव, ता.शिरुर) असे बस चालकाचे नाव आहे. त्यांनी सांगितले की, वायर जळाल्याचा वास आल्याने गाडी बाजूला घेतली. खाली उतरून पाहिले असता चालकाच्या बाजूचा मागील टायरमधून धूर निघत होता.
तातडीने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. माझ्या जवळील पाण्याच्या बाटलीतील पाणी टायरवर टाकून धूर कमी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.
प्रवाशी उतरत असतानाच टायरने पेट घेतला. आग भडकल्याने दुसऱ्या बाजूच्या टायरनेही पेट घेतला. मोठा आगीचा डोंब उसळला. अग्निशमन दलास माहिती दिली. आग लागल्याने चांदनी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होती परिणामी अग्निशमन यंत्रणा पोचण्यास वेळ लागला. गाडीतील सीट, इंजिन यांनी पेट घेतला त्यात अल्युमिनियम वितळून गेले. आग विझविली तरी इंजिनमध्ये स्पार्किंग होत आल्याने त्यांनी बॅटरीतून बाहेर जाणारा प्रवाह तोडला.पाषाण व कोथरूड येथील दोन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. कोथरूडचे केंद्रप्रमुख गजानन पाथरुडकर, युवराज जाधव, अंकुश पालवे, हर्षवर्धन भंडारे, संग्राम कोथरूड चे कर्मचारी यांनी ही आग विझविली.
स्थानिक नागरिक व हिंजवडी वाहतूक विभाग यांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्गावर सुतारवाडीच्या मागे पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे बावधन खुर्द व बावधन बुद्रुक मधील अंतर्गत रस्त्यावर देखील वाहतुक कोंडी झाली होती.