<
संस्थांचे सेवाकार्य समाजापुढे आणण्याची सुवर्णसंधी
जळगाव – (प्रतिनिधी) – समाजातील गरजू, वंचित, उपेक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या, त्यांना तगण्यातून जगण्याकडे नेणाऱ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या सेवाभावी संस्थांसाठी आणि सेवाकार्य करणाऱ्या सेवामहर्षींसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मल्हार हेल्प-फेअरचे आयोजन १५ ते १७ फेब्रुवारी २०२० दरम्यान सागर पार्क, जळगाव येथेकरण्यात आले आहे.
लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या हेल्प-फेअरमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, दिव्यांग, मुक्या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या आणि त्या प्रमाणेच अश्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आमंत्रित करण्यात येत असते. या संथांना येथे विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतात. त्याचप्रमाणे त्यांच्या भोजनाची व बाहेरगावहून आलेल्या संस्था चालकांच्या राहण्याची व्यवस्था देखील हेल्प-फेअर टीम कडून करण्यात येते. हेल्प-फेअरच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात अनेक संस्थांना त्यांचे सेवाकार्य समाजापुढे आणण्याची संधी मिळाली आहे. त्या प्रमाणेच समाजासाठी अबोलपणे आणि कुठलीही प्रसिद्धी न करता विधायक कार्य करणाऱ्या सेवामहर्षींची गॅलरी देखील हेल्प-फेअर मध्ये बनविण्यात येते. या माध्यमातून पडद्यामागील या खऱ्या हिरोंना समाजापुढे आणण्याचे कार्य हेल्प-फेअरच्या माध्यमातून करण्यात येते. जेणेकरून गरजूना मदत करणाऱ्या कार्यसंथांचे कार्यक्षेत्र विस्तारून, व्यापक होऊन त्यांच्या कार्यास चालना, गती व उभारी मिळते.
मदत घेणारे आणि मदत देणारे असे हजारो हात मदतीचे येथे पहावयास व अनुभवण्यास मिळणार आहे. ज्यांना मदत घ्यायची आहे त्या व्यक्ती संबंधित संस्थांना आणि व्यक्तींना येथे प्रत्यक्ष भेटू शकतील. तसेच ज्या दात्यांना संस्थांना किंवा सेवामहर्षींना मदत करायची आहे असे दाते देखील येथे संस्थांना आणि व्यक्तींना भेटून त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतील
सदर प्रदर्शनीत सहभागी होणाऱ्या संस्थांची निवड प्रक्रिया सुरु झालेली असून तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्तींपर्यंत आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी असून त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त सेवाभावी संस्था, एनजीओज व सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन हेल्प-फेअर टीमकडून करण्यात येत आहे. नाव नोंदणी वा अधिक माहितीसाठी ९९६०८ ९३९१६ आणि ८४४६१ ०१७५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.