<
जळगाव : राणी पद्मावती…अरबी नववधू… मिस वर्ल्ड… काश्मिरी मुलगी… शिक्षक… जोधा… वकील…संस्कृत शिक्षक…यांसह अनेक जण एकाच मंचावर बुधवारी अवतरले होते. प्रसंग होता मेहरूणच्या एच.जे.थीम महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा. विद्यार्थ्यांनी धम्माल करीत काळजाला भिडणाऱ्या गझली, कव्वाली देखील सादर केल्या. विविध गीतांवर जल्लोष केला.
महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे सकाळी महाविद्यालय विकास समिती चेअरमन डॉ. इक्बाल शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक अमीन बादलीवाला, जफर शेख, प्राचार्य डॉ. सय्यद शुजाअत अली, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. राजेश भामरे उपस्थित होते. दिपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. प्रस्तावना डॉ. भामरे यांनी केली.
यावेळी डॉ. इक्बाल शाह आणि प्राचार्य डॉ. सय्यद अली यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी अध्यक्षस्थानी बोलताना डॉ. करीम सालार म्हणाले की, स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी वर्तमान समस्यांची मांडणी करावी. कला सादरीकरणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास दृढ होतो. प्रतीभेपेक्षा चरित्र महत्वाचे आहे. अंगभूत कला, कौशल्याचा वापर करीत व्यावसायिक बनावे असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. मुजम्मील काझी यांनी तर आभार डॉ. वकार शेख यांनी मानले.
यावेळी विद्यार्थ्यांनी कवी संमेलन, एकांकिका, फेन्सी ड्रेस, भक्तीगीते, कव्वाली, गजल असे कार्यक्रम सादर केले. यावेळी यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. आय. एम. पिंजारी, डॉ. वाय.इ.पटेल, डॉ. चांद खान, डॉ. मुस्तकीम बागवान, डॉ. राजू गवरे. प्रा. फरहान शेख, प्रा. साजिद मलक, डॉ. तन्वीर खान, डॉ. हाफिज शेख, प्रा. रेखा देवकर, प्रा. फिरदोस सिद्दिकी, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. आयेशा बासित, प्रा. कहेकशा अंजुम, डॉ. एस. जी. डापके, डॉ. अमीन काझी, डॉ. इरफान शेख, डॉ. फिरदोस शेख आदींनी परिश्रम घेतले.
सांस्कृतिक कार्यक्रमात आली रंगत
स्नेहसंमेलनात राहिला आणि कौसर यांनी ‘ हमीद का चिमटा’ हि मिमिक्री सादर केली. ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘तुझसे नाराज नही जिंदगी’, ‘काली काली जुल्फे’ अशी विविध गझल विद्यार्थ्यांनी म्हटली. तसेच ‘तू कुजा मन कुजा’, ‘तेरे रहेमतो का दरिया’, ‘सोचा नही था’, ‘हम तुमसे परेशान’ अशा अर्थपूर्ण कव्वाली विद्यार्थ्यांनी सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली. एकांकिकामध्ये ‘भारत की एकता’, ‘आओ भारत देखे’ यांनी देशभक्ती जागवली. शिवाय ‘शादी की फिजूल रस्मे और हमारा किरदार’, ‘हया’ या नाटकांनी प्रबोधन केले. ‘काली कमली वाला’, ‘ तु शामे रीसालत है’, ‘मौला ए मौला’, ‘वो नूर बनके आया’, ‘कोई कैसे समझ पाएगा’ या भक्ती गीतांनी वातावरण भक्तीमय केले. याशिवाय मुशायरा देखील विद्यार्थ्यांनी सादर केले. फेन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दीपिका पदुकोणचा छपाक सिनेमातील लुक, डॉक्टर, बसंती, झांसी की राणी, चार्ली चाप्लीन अशा विविध पात्रांचा वेशभूषेसह अभिनय सादर केला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.