<
“कौटुंबिक व्यवसाय कसा पुढे नेता येईल” या विषयावर रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात प्रा. समिश दलाल यांचे व्याख्यान
जळगाव-(प्रतिनिधी)- प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यश मिळविण्याची अभिलाषा मनात बाळगून असते. परंतु असे यश मिळवण्यास आवश्यक असलेली इच्छाशक्ती आणि कुवत किंवा पात्रता तिच्यात सुप्त स्वरुपात आहे याविषयी ती अनभीज्ञ असेल, तर ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून अशी सुप्त शक्ती ओळखणे आणि तिचा विकास करणे, हा यशस्वी होण्याचा सर्वात महत्वाचा नियम आहे. तसेच प्रत्येकाने आयुष्यात सतत सकारात्मक असले पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आपल्या तोंडून “मॅनेज हो जायेगा” हे वाक्य उद्योजकांच्या तोंडून निघायला हवे असे प्रतिपादन एस. पी. जैन, मुंबई येथील व्यवस्थापनशास्त्राचे प्राध्यापक व सुपरिचित प्रा. समिश दलाल यांनी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटचे विश्वस्त व श्रद्धा इंडस्ट्रीचे संचालक महेंद्र रायसोनी, रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापक संचालक अविनाश जैन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे प्र. कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत सांगितले की व्यवसायाच्या परिस्थितीतील बदल लक्षात घेता कौटुंबिक व्यवसायातही बदल होणे आवश्यक आहे. पारंपारिक व्यवसायात त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळाल्यास ते उत्तम प्रदर्शन करू शकतात. डॉ. अग्रवाल यांनी यावेळी आशा व्यक्त केली की या विषयावरील प्राध्यापक समिश दलाल यांचे व्याख्यान उपस्थितांसाठी नक्की उपयुक्त ठरेल. प्रा. समिश दलाल यांचा परीचय सदर करताना प्रा. राहुल त्रिवेदी यांनी माहिती दिली की, प्रा. समिश दलाल मुंबईचे एस. पी. जैन या महाविध्यालयात व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि संवाद, उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात खास आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅड विध्यापिठातून एमबीए केले. आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि व्हार्टन बिजनेस स्कूल मधील दोन प्रमुख कार्यकारी शिक्षण कार्यक्रमाद्वारे त्यांचे कौशल्य आणखी वाढले. कौटुंबिक व्यवसायाच्या बाबतीत त्यांचा दीर्घ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कौटुंबिक व्यवसायाच्या विषयावर दोन लाखाहून अधिक विध्यार्थ्यांना शिकवले आहे आणि पन्नास हजाराहून अधिक भारतीय कौटुंबिक व्यवसायांशी संबधित प्रकरणाचा अभ्यास केला आहे. त्यांचे केसस्टडी जगातील सर्वोत्तम विक्रेते आहेत आणि त्यांना टीईडीएक्सवर व्याख्यानासाठी देखील आमंत्रित करण्यात आले आहे. प्रा. राहुल त्रिवेदी यांनी परिचय दिल्यानंतर प्रा. समिश दलाल हे आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आपल्या संस्कृतीत ग्राहकवाद संस्कृती आहे. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे सतत उत्पादने आणि सेवांची आवश्यकता असेल. अव्यवस्थित आणि जुगाडवर काम करणे ही आपली संस्कृती आहे, जी कधीही अपयशी ठरत नाही. व्यवसायासाठी वेळ कधीच अनिश्चित नसतो आणि कौटुंबिक व्यवसायात सर्व प्रकारच्या चढउतारांचा सामना करावा लागतो. आपला वर्तमान ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आवश्यकतेनुसार अन्य बाजाराच्या यशस्वी उत्पादनात बदल करून उद्योजक त्यांच्या बाजारात यशस्वी होऊ शकतात. जुन्या पिढीला नवीन पिढीबरोबर संरेखीत करणे आणि नवी पिढीच्या नवीन कल्पना स्वीकारणे आवश्यक आहे असे दलाल म्हणाले. तसेच आपल्या पुढच्या पिढीला नेहमी समस्यांऐवजी तोडगा शोधण्यावर लक्ष केंद्रित करायला शिकवा. त्यांनी उपस्थितांना सांगितले की त्यांच्या कामात सिरीयस न राहता, सिन्सियर बनण्याचा प्रयत्न करा आणि सुट्टीप्रमाणेच आपल्या कामाचा आनंद घ्या. अपयशाला घाबरू नका अपयश ही यशाची पहिली पायरी असते. यावेळी व्यावसायिक अनिल कांकरिया, राजुल रायसोनी, सकाळचे संपादक राहुल रनाळकर, चंद्रकांत नेवे, सागर दुबे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्रा. मकरंद वाठ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. विनोद महाजन व प्रा. तन्मय भाले यांनी सहकार्य केले.