<
जळगाव – गेल्या दोन वर्षांपासून आयोजिल्या जाणाऱ्या हेल्प-फेअरचे या वर्षी दि. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गरजू, वंचित, उपेक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांसाठी आणि सेवाकार्य करणाऱ्या सेवामहर्षींसाठी योग्य प्लॅटफॉर्म उभा रहावा, त्यांच्या कार्याला ओळख, मदत आणि कौतुकाची थाप मिळावी म्हणून लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा हेल्प-फेअरचे आयोजन करण्यात येत असते. दोन वर्षांच्या यशस्वी आयोजना नंतर या वर्षी काही नव्या कल्पनांचा आणि गोष्टींचा समावेश असल्याने यंदाचे हेल्प-फेअर जास्त प्रेरक आणि परिणामकारक ठरणार आहे.
गेल्या दोन वर्षात हेल्प-फेअरमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्थांनी सहभाग नोंदविला होता. या वर्षी जळगाव जिल्ह्यातील संस्थांसोबतच जिल्ह्या बाहेरील संस्थांचा देखील समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे समाजोपयोगी एखादी अनोखी, अभिनव संकल्पना आहे त्यांना स्टार्टअपसाठी हेल्प-फेअरमध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून ते आपली कल्पना दात्यांसमोर मांडू शकतील. हेल्प-फेअरमध्ये साधारण पन्नास संस्थांचे स्टॉल आणि जवळ-जवळ चाळीस सेवाव्रतींच्या गॅलरीचा समावेश असणार आहे. संपूर्ण प्रदर्शनी पाहण्यात बराच वेळ जात असल्याने येथे खाद्यप्रेमींसाठी खान्देशी आणि विविध खाद्य पदार्थांचे देखील स्टॉल असणार आहे. सदर फूड स्टॉल बचत गट चालविणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या आर्थिक स्थैर्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल.
सेवाकार्याच्या या कुंभमेळ्याला भेट देणाऱ्यांना विरंगुळा म्हणून येथे दिव्यांग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे मनोरंजनाच्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे.
अश्या या आगळी-वेगळ्या प्रदर्शनीमध्ये नाव नोंदणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या या तीन दिवसीय सेवाकार्याच्या महामेळ्यात लवकरात लवकर जास्तीत जास्त सेवाभावी संस्था, एनजीओज व सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन हेल्प-फेअर टीमकडून करण्यात येत आहे. नाव नोंदणी वा अधिक माहितीसाठी ९९६०८ ९३९१६ आणि ८४४६१ ०१७५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा