<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात भारताच्या इतिहासामध्ये महिलांनी कर्तुत्व गाजवल्याच्या घटना आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी लोककल्याणकारी स्वराज्याची संकल्पना मांडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले व त्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराज यांनी घडवून आणला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या विरोधात लढण्यासाठी राजाराम महाराजांनी प्राणांतिक लढा दिला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम ७ वर्ष तेवत ठेवला तो राजाराम महाराज यांच्या पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराराणी यांनी होय. महाराणी ताराराणी या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत. पती मेल्यानंतर सती न जाता छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला औरंगजेबा पासून वाचविण्यासाठी थेट औरंगजेबाशी विजयी लढा दिला. मराठ्यांचे स्वराज्य औरंगजेब आपल्या हयातीमध्ये घेऊ शकला नाही. औरंगजेबाचा इतिहासकार खाफिखान म्हणतो, “ताराराणी ही राजाराम महाराजांची थोरली बायको, बुद्धिवान व शहाणी होती. सैन्याच्या नेतृत्वाच्या आणि मोहिमांच्या नियोजनाच्या राज्यकारभाराचे गुण तिच्यात प्रकर्षाने प्रकट झाले.” महाराणी ताराराणी यांची समाधी साताऱ्यापासून ६-७ किमी अंतरावर असणाऱ्या संगम माहुली या गावात नदीकाठी आहे. ही समाधी जेव्हा आपण पाहतो, तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. आम्ही ती समाधी पाहिली व मन विषन्न झाले. मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा साधा चबुतरा सुद्धा नाही. मातीमध्ये दगडी चौसरा केला असून त्यावर प्लास्टिकच्या पुड्या, बाटल्या अशी घाण दिसली. भारतीय पुरातत्त्व विभाग व महाराष्ट्र शासन यांना आम्ही विनंती करतो की, ही समाधी जर तुमच्याने बांधली जात नसेल तर समाधी बांधण्याची पूर्ण जबाबदारी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद घेत आहे. आपण समाधी बांधण्याची परवानगी द्यावी. आम्ही समाधी बांधून त्याच्या लोकार्पणाला आपल्यालाच आमंत्रित करु. असे निवेदन जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच पुरातत्त्व विभागाला पाठवण्यात आले. निवेदन देते वेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री रुपेश महाजन, जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री मनोज बाविस्कर, शिवश्री रोहन महाजन आदी उपस्थित होते.