<
एकत्र मुव्ही पहाणं, बाहेर फिरणं, हॉटेलमधे जाणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, तास न तास एकमेकांच्या सहवासात जोडलेले रहाणं म्हणजे खरं प्रेम नव्हे…
एखाद्याच्या प्रेमात पडायला एक क्षणही पुरेसा असतो पण त्याच प्रेम मिळायला किती दिवस,किती वर्षं लागतील अंदाज नसतो. प्रेम मिळणं इतकं सोप्पं असतं का? नशिबवान असतात ते ज्यांना ते मिळतं. प्रेमाचा खरा अर्थ समजून न घेता बऱ्याचदा भावनिक आकर्षणालाच प्रेम समजून प्रेम करणाऱ्यांची संख्या इथं चिक्कार आहे.
एकत्र मुव्ही पहाणं, बाहेर फिरणं, हॉटेलमधे जाणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, तास न तास एकमेकांच्या सहवासात जोडलेले रहाणं म्हणजे खरं प्रेम नव्हे. या साऱ्या गोष्टी भावनिक आणि क्षणिक सुखाच्या यात प्रेम कमी आणि आठवणीच जास्त यातून माणूस कळत नाही. प्रेमात माणूस कळायला हवा.
त्याला समजून घेण्यासाठी वेळ लागतोच. त्याचं मन आणि विचार जाणून घेणं खूप महत्वाचं आणि हे तेंव्हाच कळतं जेंव्हा तुम्ही त्याच्या मनाशी कनेक्ट होता. ज्या मनात एकमेकांविषयी आंतरिकओढ, काळजी, आदर, आपुलकी आहे. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून समोरच्याला आनंदी करण्याची धडपड आहे. तिथेच खरं प्रेम आहे!
जी व्यक्ती तुम्हाला सोडून जाते ती मनाने तुमच्याशी कधीच कनेक्ट झालेली नसते. कुठल्याही परिस्थितीत मनाने जोडलेली व्यक्ती कायम तुमच्या सोबत राहते. आपल्या जाण्यानं समोरच्याला किती त्रास होेईल हे नक्की तिला समजतं.
बऱ्याचदा समोरच्याला तुमच्याबद्दल काय वाटते? त्याच्यासाठी सुध्दा हे नातं तितकंच महत्वाचं आहे का? ती व्यक्ती तुमच्यात मनापासून खरंच गुंतलीय का? ती आपल्याला तितकाच जीव लावतेय का? हे काहीही जाणून न घेता तुम्ही वेड्यासारखं प्रेम करता, जीव लावता. खूप घाई करता. तुमच्या असण्याने किंवा नसण्याने जर तिच्या आयुष्यात काही फरक पडत नसेल. त्या व्यक्तीची तुमच्याशी केवळ भावनिक संलग्नक असेल तर तिच्या मागे न धावता वेळीच नात्यातून बाहेर पडायला हवं. हा निर्णय तुमच्यासाठी खूप अवघड असतो. पण मन शांत ठेवून तो घ्यायचाच असतो. मनावर कुठलाही ओरखडा न उमटता नात्यातून शांतपणे बाहेर पडायचं असतं.
आयुष्यात घडलेल्या अशा प्रसंगातून एकच शिकायचं की समोरच्या व्यक्तीला आपलं प्रेम कळालं नाही म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. तुमचं निरपेक्ष, निःस्वार्थ प्रेम नाकारून ती जात असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमाच्या लायकीची नव्हतीच. तुमची निवड चुकीची होती.
आयुष्य नेहमीच जगण्याची नवीन संधी देतं. एक दार बंद झालं की दुसरं आपोआपच उघडतं. याहूनही खास कुणीतरी तुमच्यावर प्रेम करणारं. नक्कीच तुमची वाट पाहात थांबलेलं असेल!
•••••••••••••••• संकलन ••••••••••••••••••••
अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण
( एम.ए.अर्थशास्त्र )
एल.एल.बी.,पीजी.डी.आय.पी.आर.
सी.सी.डी.सी.अपार्टमेंट पहिला मजला, प्लाँट नं.०२ समर्थ काँलनी हाँटेल पांचाली जवळ,प्रभात चौक जळगाव, ४२५००१
[email protected]