<
जळगाव : मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात हळदी कुंकुचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा देखील पार पडल्या.
सुरुवातीला महिला शिक्षकांनी महिला पालकांचे औक्षण केले. त्यानंतर छाया केदार यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शीतल कोळी होत्या. महिला पालकांनी उखाणे सादरीकरण केले. प्रसंगी महिलांसाठी संगीत खुर्ची आणि धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळण्याचा आनंद लुटला. यातील धावण्याच्या स्पर्धेतील वर्षा बोरसे व ज्योती माळी तसेच संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये कविता साने आणि ज्योती पाटील या विजेत्यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव मुकेश नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन उज्वला नन्नवरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यालयातील शिक्षक कविता बढे, शोभा सपके, गीता भावसार, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.