<
जळगाव : खो खो, कबड्डी, लगोरी, लपाछपी यासह अंतर्गत खेळ खेळण्याचा आनंद मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी लुटला. अभ्यासासह शारीरिक विकासासाठी व्यायाम म्हणून तसेच देशी मैदानी खेळांचे महत्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विशेष उपक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.
लहान मुलांमध्ये देखील मोबाईल पाहणे व त्यात गेम खेळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता हा उपक्रम घेण्यात आला. मोबाईलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगून देशी खेळांना खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे असे यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव मुकेश नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. उपशिक्षिका रोहिणी शिंदे यांनी विविध खेळांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी टायर फिरविणे, हॉकी, फुटबॉल, आंधळी कोशिंबीर, संगीतखुर्ची, क्रिकेट, दोरी उड्या, लंगडी, यासह बुद्धिबळ, कॅरम, भातुकली आदी इनडोअर खेळ मनसोक्तपणे खेळत धम्माल केली. मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शिस्तबद्धतेने खेळ खेळले. यावेळी विद्यालयातील शिक्षक कविता बढे, शोभा सपके, गीता भावसार, किरण पाटील, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, माधुरी विदुर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.