<
जळगाव-(प्रतिनिधी) – माणसाच्या व्यक्तिमत्वाचे अनेकविध पैलू आज आपल्याला बघावयास मिळतात. टीमवर्क असो की कुठलेही क्षेत्र खेळीमेळीने व मोठा विचार आत्मसात करून केलेले काम हीच “सक्सेस कि” आहे असे विचार, कॉर्पोरेट व सुप्रसिद्ध लेखिका नीलांबरी जोशी यांनी केसीई सोसायटीच्या आय. एम. आर.इंस्टिट्यूट येथे आयोजित “औद्योगीक नेतृत्व आणि संघटित मानसिकता” या व्याख्यानात केले. केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्तं या व्याख्यानाचे आयोजन आय.एम. आर.ला केले होते.
यावेळी व्यासपीठावर के.सी.ई. सोसायटीचे सन्माननीय सहसचिव प्रमोद पाटील, आय.एम. आर च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हटल्या की, आज उद्योग क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला पाहावयास मिळतात यात काही मितभाषी तर काही बोलक्या स्वभावाचे आहेत असे जरी स्वभावाचे पैलू असले तरी आज प्रत्येकाने त्याच्या अनुभव व कौशल्याचा वापर करीत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू केलेला व्यवसाय आज उच्च स्तरावर नेऊन ठेवला आहे याचे गमक केवळ सर्वांविषयी असलेली सहकार्याची भावना हे आहे, यात शंका नाही. जीवनात तुम्हाला उद्योग क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची तसेच बदलत्या काळानुसार स्वतः बदल घडवून आणणे तितकेच महत्वाचे आहे. या क्षेत्रात यशाची उंच भरारी तुम्ही नक्की गाठू शकाल, असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना मांडले यावेळी त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगात उद्योजकांचे व्यक्तिमत्व कसे घडले याविषयी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, टीमवर्क करताना ते टिमवर्क मर्यादित न ठेवता त्याचा आवाका वाढवल्यास व्यक्तिमत्व विकासला अनेकविध पैलू पडतात. टीम बिल्डिंग आणि लीडरशिप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने या क्षेत्रात करियर करायचे असल्यास स्वतःला सिद्ध करावे लागेल. असे त्या म्हटल्या..या कार्यक्रमाला उद्योजक म्हणून रोटरीचे कॅप्टन मोहन कुलकर्णी, अमित साखला, रोहित पोतदार, गोकुळ संघवी, संगीता अट्रावलकर, डॉ. वायकोळे, संदीप शर्मा रोटरीचे सचिव विजय काबरा, उद्योजक किशोर देशमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. शमा सराफ यांनी केले.