<
नवी दिल्ली – हा विजय केवळ दिल्लीचा नसून संपूर्ण देशाचा आहे अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली. दिल्लीत तिसऱ्यांदा सत्ता स्थापित करू पाहणारे केजरीवाल यांच्या मते, दिल्लीकरांनी आज निवडणुकीच्या निमित्ताने नवीन राजकारणाला जन्म दिला. हेच राजकारण दिल्लीसह देशाला 21 व्या शतकात नेईल. केजरीवाल यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी वंदे मातरम, इन्कलाब झिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले, की दिल्लीकरांनी या निवडणुकीत मतदार मतदान कुणाला देणार हे देखील स्पष्ट केले. साऱ्या देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये हाच संदेश दिला जाईल. यापुढे मतदान त्यालाच दिले जाणार जो मोहल्ला क्लिनिक निर्माण करेल… यापुढे मतदान त्याला मिळेल जो 24 तास वीज पुरवठा करेल… आता मतदान त्यालाच मिळेल जो घरा-घरांमध्ये मोफत पाणी देईल. एकूणच दिल्लीच्या जनतेने देशवासियांना नवी उमेद दिली आहे. हीच भारत मातेची देणगी आहे असे ते पुढे म्हणाले आहेत.
आपल्या मुलाला तिसरी संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद
विजयानंतर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी दिल्लीची जनता, आपचे कार्यकर्ते आणि आपल्या कुटुंबाचे देखील आभार मानले. कार्यकर्त्यांसह आपल्या पत्नी आणि कुटुंबियांनी सुद्धा दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यामुळे, त्यांचे देखील आभार मानतो. दिल्लीच्या जनतेने मला मुलगा मानून साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. सोबतच, योगा-योगाने आज मंगळवार आहे आणि हनुमानाचा दिवस आहे. त्यामुळे, हनुमानाचे देखील आभार मानतो. आता ईश्वराने मला आणखी 5 वर्षे याच उत्साहाने काम करत राहणे आणि दिल्लीला सर्वात सुंदर बनवण्याची शक्ती द्यावी अशी कामना केजरीवालांनी केली.