<
जळगाव – मेहरुण तलाव चौपाटीवर संशयितरित्या फिरणार्या दोन तोतया पोलिसांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील एअर गन व मोटारसायकल हस्तगत केली आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन रमेश काळे, (वय-२३, तरसोद ता. जळगाव) आणि रवींद्र भागवत चौधरी (वय २३, भादली ता. जळगाव) असे दोन्ही तोतया पोलिसांची नावे आहेत. दोघं संशयित मेहरुण तलाव चौपाटी भागात रायसोनी फॉर्म हाऊसजवळील चौपाटीवर मंगळवारी सायंकाळी एका व्यक्तीस थांबवून काहीतरी विचारपूस करीत होते.
दोघं व्यक्तींकडे पोलीस विभागाची फायबर काठी आणि एकाकडे एअरगन आढळून आली. त्यांनी चौपाटीवर बसलेला गौरव राजेंद्र पवार (रा. चंदूअण्णानगर) याला दोघांनी पोलीस असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला. तर गौरव पवार याने ‘तुम्ही पोलीस असल्याचा पुरावा दाखवा’ असे सांगितल्यानंतर दोघांनी ओळखपत्र नसल्याचे सांगितले.
यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी पवन काळे आणि रवींद्र चौधरी यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात पोलीस विभागाच्या फायबरची काठी, पोलीस शिटी, स्पोर्टस् हंक्स, मोटारसायकल आणि एक विनापरवाना एअरगन आढळून आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई – ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, कॉन्स्टेबल सचिन पाटील, मुकेश पाटील, सचिन चौधरी यांनी केली. याप्रकरणी सचिन चौधरी यांनी विशेष कामगिरी केले असून त्यांच्याच फिर्यादीवरुन दोघं तोतया पोलीसांना आता अस्सल पोलिसांचा हिसका दिसणार आहे