<
कोल्हापूर – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले. त्यामुळे ही रेल्वे स्थानकातच थांबविण्यात आली. परिणामी या रेल्वेतील दोन हजार प्रवाशांना याचा फटका बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ ठाणे व कल्याण येथील आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफने महिला आणि लहान मुलांना प्राधान्य दिलं असून रबराच्या बोटीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप ठिकाणी पोहचवण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत 500 प्रवाशांना बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांची सुटका करण्यात यश आले आहे. त्यामधील एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याची माहितीही समोर आली आहे.