<
अॅड. एस.ए.बाहेती महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
जळगाव : विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळवीत असताना नियोजन आणि शिस्तीला महत्व द्यावे. अभ्यासाला निश्चित वेळ दिली तर आपल्याला यश नक्की मिळते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.प्रदीप तळवलकर यांनी केले. यावेळी कॉलेजरत्न पुरस्कार अक्षय जाधव या विद्यार्थ्याला देण्यात आला.
येथील अॅड. एस.ए.बाहेती महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम गुरुवारी १३ रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आला. यावेळी डॉ.तळवलकर बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव रोहन बाहेती होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआय संस्थेच्या अध्यक्षा स्मिता बाफना, संस्थेचे संचालक राधेशाम कोगटा, नगरसेवक नितीन बरडे, प्राचार्य डॉ.अनिल लोहार, माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष यशवंत चौधरी उपस्थित होते.
प्रथम अॅड.सीताराम बाहेती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.खेमराज पाटील यांनी प्रस्तावनेत कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. स्मिता बाफना यांनी सांगीतले की, महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासाच्या संधी मिळतात, आपण त्याचे सोने केले पाहिजे. महाविद्यालयीन जीवनात गमतीजमती, खेळ देखील तेवढेच महत्वाचे आहेत, असेही ते म्हटले.
प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांनी, महाविद्यालयातील 82 विद्यार्थी आजवर सीए झालेले आहेत. महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा कायम ठेवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाची पताका कायम उंचावत ठेवावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. डॉ.प्रदीप तळवलकर यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यातील वेळेचा अपव्यय न करता वेळेची बचत करून यश मिळवावे, असे सांगितले. यावेळी विविध यश मिळविलेल्या प्रा.आर.पी.सोनवणे, डॉ.खेमराज पाटील, प्रा.हरीश शेळके, प्रा.विजय ठोसर, प्रा.नेहा शर्मा या शिक्षकवृंदाचा सन्मान करण्यात आला.
यानंतर शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातून सॉफ्टबॉल खेळाडू महेंद्र सोनगिरे, वरिष्ठ महाविद्यालयातून कबड्डी खेळाडू तेजस सपकाळे यांना गौरविण्यात आले. क्रिकेट खेळाडू अक्षय जाधव याला कॉलेजरत्न म्हणून सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रोहन बाहेती यांनी, विद्यार्थ्यांनी यशाचा आलेख नेहमी चढता ठेवावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.नीलिमा ठमके यांनी केले. आभार प्रा.नेहा शर्मा यांनी मानले.