<
जळगाव – विविध क्षेत्रात कार्य करणा-या तब्बल पन्नास पेक्षा अधिक सेवाभावी संस्था आणि अबोलपणे, कुठलाही गाजावाजा न करता समाजासाठी झटणारे सेवामहर्षी यांची प्रदर्शनी म्हणजेच मल्हार हेल्प-फेअर ३ चा शुभारंभ आज सायंकाळी ५ वाजेला सागर पार्क, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने मदत देणारे आणि घेणारे असे मदतीचे हजारो हात एकाच छताखाली एकत्र येत आहेत.
लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन आणि मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा आयोजित हेल्प-फेअर ३ मध्ये जळगाव जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, अंध – दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यात असणार आहे.आतापर्यंत पन्नास पेक्षा अधिक संस्थांची आणि सेवा महर्षींची हेल्प-फेअर ३ साठी नोंदणी झालेली असून हेल्प-फेअरच्या या प्लॅटफॉर्मद्वारे आपले सेवा कार्य जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांना याचा लाभ देण्यासाठी या संस्था सज्ज झाल्या आहेत.
हेल्प-फेअर ३ मधील आजचे कार्यक्रम –
शुभारंभ सोहळा – समाजातील गरजू, उपेक्षित, वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे संस्था चालक, कार्यकर्ते, समाजातील दानशूर व्यक्ती तसेच प्रतिष्ठित व्यक्ती आणि समाजाप्रती संवेदनशील असणाऱ्या हजारो खान्देशकरांच्या उपस्थितीत आजचा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे.
प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन – हेल्प-फ़ेअर ३ च्या शुभारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून सेंटर फॉर ई – गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्चचे संचालक तसेच लोकसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज पोळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
खाद्य संस्कृतीची जत्रा –
संपूर्ण प्रदर्शनी पाहण्यात बराच वेळ जात असल्याने येथे खाद्यप्रेमींसाठी खान्देशी आणि विविध खाद्य पदार्थांचे देखील स्टॉल असणार आहे. सदर फूड स्टॉल बचत गट चालविणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या आर्थिक स्थैर्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल. सेवाक्षेत्राच्या कार्याचा आढावा घेत असतानांच सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत खाद्य संस्कृतीचा मनमुराद आनंद नागरिकांना लुटता येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी –
सेवाकार्याच्या या कुंभमेळ्याला भेट देणाऱ्यांच्या करमणुकीसाठी येथे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे, संस्थांचे तसेच दिव्यांग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्तींपर्यंत आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी असून त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मानवतेच्या या मंदिरांना म्हणजेच हेल्प-फेअरला भेट द्यावी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मल्हार हेल्प-फेअर टीमकडून करण्यात आले आहे.