<
राज्य बालनाट्य स्पर्धेत वापरली चोरीची संहिता अमळनेर येथील सानेगुरुजी विद्यालयातील शिक्षकाचा प्रताप
जळगाव(प्रतिनीधी)- नुकत्याच जळगाव केंद्रावरील१७ व्या राज्य बालनाट्य स्पर्धा संपन्न झाल्या. या बालनाट्य स्पर्धात प्रथम आलेल्या अ..आ..आकलन या बालनाट्याचे लेखक दिग्दर्शक संदीप घोरपडे यांच्यावर संहिता चोरीचा आरोप करीत मूळ लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. नाटकवाल्यांच्या हक्कासाठी लढणारी संस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीत संदीप घोरपडे हे सदस्य म्हणून आहेत. मात्र या परिषदेतील सदस्यानेच एका नाट्यकर्मीच्या हक्कांची पायमल्ली केल्याने, सांस्कृतिक क्षेत्रात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, १७व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेले बालनाट्य अमळनेर येथील सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाने सादर केले होते. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक म्हणून या संस्थेचे सचिव व सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संदीप घोरपडे यांचे नाव होते. मात्र पुणे येथील अॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसीनुसार अ..आ…आकलन या बालनाट्याचे लेखन जळगावातील ज्येष्ठ बालनाट्य लेखक व दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड सध्या पुणे येथे वास्तव्यास असून, त्यांनी २००७ मध्ये सादर केलेल्या हे जीवन सुंदर आहे व २०१० मध्ये सादर केलेल्या आम्ही गेलो बाराच्या भावात या दोन बालनाट्यातील प्रसंग जसेच्या तसे या बालनाट्यात वापरण्यात आले आहेत. या नोटीसनुसार संदीप घोरपडे यांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांना अमळनेर येथे आमंत्रित करून त्यांच्याकडून बालनाट्य लिहून घेतले व दिग्दर्शीतही करून घेतले. मात्र प्रत्यक्ष सादरीकरणाच्या दरम्यान लेखक व दिग्दर्शक म्हणून स्वतःचे नाव लावले. अ..आ…आकलन या बालनाट्याला १७ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या सांघिक पारितोषिकासह दिग्दर्शन, अभिनयासह इतर बाबींचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. यानंतर ज्ञानेश्वर गायकवाड यांनी संदीप घोरपडे यांच्याशी संपर्क साधून लेखक म्हणून नाव का वापरले नाही याबाबत विचारणा केली असता, या चुकीची दुरुस्ती अंतिमच्या प्रयोगाला करतो यासाठी त्यांनी आश्वस्त केले परंतु अंतिम फेरीचे वेळापत्रक आल्यानंतर त्यातही लेखक दिग्दर्शक म्हणून संदीप घोरपडे यांचे नाव प्रसिध्द झाल्याने, ज्ञानेश्वर गायकवाड यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी अॅड.राजेंद्र ठाकूरदेसाई या आपल्या वकीलांमार्फत संदीप घोरपडे यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
ज्ञानेश्वर गायकवाड यांचा परिचय
ज्ञानेश्वर गायकवाड हे मूळचे जळगाव येथील असून, येथील अपंगसेवा मंडळाच्या मूकबधीर विद्यालयात शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. १९८४पासून बालनाट्य क्षेत्रात लेखक व दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक बालकलावंत घडवले. त्यातील अनेक कलावंत आजही जळगावसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तसेच व्यावसायिक नाटक, सिरीयल्स व चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्यासाठी सात वर्षांपूर्वी ते नोकरीतून सेवानिवृत्ती घेऊन पुणे येथे वास्तव्यास गेले. गेल्या १६ वर्षामध्ये राज्य बालनाट्य स्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या ३५ ते ४०बालनाट्यांचे प्रयोग यशस्वीरित्या सादर झाले आहेत. तसेच गेल्या १४ वर्षांपासून त्यांची महाराष्ट्रातील विविध केंद्रावर राज्य बालनाट्य स्पर्धा तसेच राज्य नाट्य स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाकडून परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.